प्रशिक्षणार्थी ‘नर्सेस’ अभ्यासक्रम सोडून गेल्या

By Admin | Updated: September 25, 2015 01:00 IST2015-09-25T01:00:10+5:302015-09-25T01:00:10+5:30

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिपत्याखाली सुरु असलेल्या परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील ४० विद्यार्थिनी प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून ...

The trainees left the 'Nurses' course | प्रशिक्षणार्थी ‘नर्सेस’ अभ्यासक्रम सोडून गेल्या

प्रशिक्षणार्थी ‘नर्सेस’ अभ्यासक्रम सोडून गेल्या

डफरिनमधील प्राचार्यावर नाराजी : राजकीय दबावामुळे अधिकारी हतबल
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिपत्याखाली सुरु असलेल्या परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील ४० विद्यार्थिनी प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच अभ्यासक्रम सोडून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील तीन दिवसांपासून हे महाविद्यालय बंद असून विद्यार्थीनींच्या शैक्षणिक भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा स्त्री रुग्णालयात ४० विद्यार्थीनी क्षमतेचे निवासी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय चालविले जाते. मात्र एक ते दोन वर्षांपासून या महाविद्यालयात प्राचार्यांच्या वाढत्या त्रासाने प्रशिक्षणार्थी परिचर्या कंटाळून गेल्या आहेत. महाविद्यालयात गरीब,सामान्य कुटुंबातील मुली येथे प्रशिक्षण घेत आहे. मात्र प्राचार्य तारा शर्मा यांच्या अफलातून कारभाराने या प्रशिक्षणार्थी परिचर्या हतबल झाल्यात. त्यांच्या एककल्ली कारभाराची तक्रार जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांकडे सुद्धा देण्यात आली. मात्र राजकीय वलयामुळे ‘डफरीन’चे प्रशासनही या महाविद्यालयात ढेपाळलेल्या कारभारावर अंकुश करु शकले नाही. अखेर प्राचार्यांच्या कारभाराला कंटाळून प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी सोमवारपासून प्रशिक्षणावर बहिष्कार टाकला. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच अभ्यासक्रम सोडून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एकूण ४० परिचर्या प्रशिक्षणार्थी विद्यार्र्थींनी अभ्यासक्रम सोडून गेल्याची माहिती आहे. हल्ली हे महाविद्यालय बंद असून येथे शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. प्राचार्याच्या कारभारावर अंकुश न ठेवणाऱ्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या प्रशिक्षणार्थी परिचर्या प्रचंड नाराज आहेत. अभ्यासक्रमाची बोंबाबोंब, आहारात अनियमितता, स्वातंत्र्यावर गदा, प्राचार्यांची असभ्य बोलणे, महाविद्यालयातील अंतर्गत राजकारणाने त्रस्त होवून प्रशिक्षणार्थी परिचर्या शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच घरी गेल्या आहेत. तर दुसरीकडे अभ्यासक्रम संपण्यापूर्वीच मुली घरी परतल्याने पाल्यांच्या काळजाचे ठोके वाजले आहे. शैक्षणिक भवितव्याचे नुकसान तर होणार नाही, ही विचारणा करण्यासाठी मुलींच्या पाल्यांची रिघ लागली आहे.

सोमवारची बैठक फिस्कटली
प्रशिक्षणार्थी परिचर्या महाविद्यालयात प्राचार्यपदावरुन निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात बैठक पार पडली. या बैठकीला आ. बच्चू कडू, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक अरुण राऊत, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव, आरोग्य उपसंचालक आदी उपस्थित होते. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर हैराण होऊन प्रशिक्षणार्थी परिचर्यांनी महाविद्यालय सोडून देण्याचा निर्णय घेतला.

एका खुर्चीवर दोन प्राचार्यांची नियुक्ती
जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी परिचर्या महाविद्यालयात दोन प्राचार्य असल्याने खुर्चीचा वाद रंगू लागला आहे. यापूर्वी तारा शर्मा यांची प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने प्राचार्यपदी नलिनी ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. मात्र शर्मा यांना ठाकरे यांची नियुक्ती अमान्य असून प्राचार्य पदासाठी त्या पात्र नसल्याचे शर्मा यांचे म्हणने आहे. त्यामुळे प्राचार्य पदावरुन अजुनच वाद चिघळला असून याचा परिणाम विद्यार्थीनींच्या शैक्षणिक भवितव्यावर तर होणार नाही, अशी चिंता पालकांना सतावू लागली आहे.

विद्यार्र्थींनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांच्या भवितव्याची काळजी घेतली जात आहे. प्राचार्यंविषयी काही नाराजी असली तरी यात तोडगा काढला जात आहे. विद्यार्र्थींनी सुटीवर गेल्या असून अभ्यासक्रम त्यांनी सोडला नाही. पुढील आठवड्यात त्या परत येतील.
- अरुण यादव
वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय.

Web Title: The trainees left the 'Nurses' course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.