रेल्वे गाड्या, प्लॅटफार्म ‘क्लिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:54+5:30
रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे बोर्डाने गाड्या, प्लॅटाफार्म, स्टेशन प्रबंधक कार्यालय, चालक, वाहक लॉबी, विश्रामगृह, आरक्षण तिकीट कक्ष, उपाहारगृह, कॅन्टीन, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस ठाण्यात महत्त्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्डवॉश अनिवार्य केले आहे.

रेल्वे गाड्या, प्लॅटफार्म ‘क्लिन’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर कमालीची स्वच्छता करण्यात येत आहे. निर्जंतुक औषधांचा वापर करून मेटल खुर्च्यांना स्वच्छ केले जात आहे. प्लॅटफार्मवर सर्वत्र लक्षणीय स्वच्छता दिसून येत असून, प्लॅटफार्मवर भ्रमंतीसाठी येणाऱ्यांना मज्जाव केला आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे रक्षक तैनात करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने काही गाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत. तर, रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे बोर्डाने गाड्या, प्लॅटाफार्म, स्टेशन प्रबंधक कार्यालय, चालक, वाहक लॉबी, विश्रामगृह, आरक्षण तिकीट कक्ष, उपाहारगृह, कॅन्टीन, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस ठाण्यात महत्त्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्डवॉश अनिवार्य केले आहे. रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर स्वच्छतेबाबत काही उणिवा असल्यास आरोग्य निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना मास्क, पोशाख, हातमोजे वितरित केले. विषाणूचा संसर्ग होणार नाही, यासाठी वारंवार उद्घोषणाद्वारे सूचना करण्यात येत आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील आॅटो स्टँड, वाहनतळ निर्जुंतकीकरण केले आहे. प्लॅटफार्मवरील प्रवासी विश्राम कक्षात आरक्षण तिकीट बघूनच नोंदणीअंती प्रवाशांना परवानगी दिली जात आहे.
मुंबई एक्स्प्रेसची बारकाईने स्वच्छता
अमरावती रेल्वे स्थानकावहून रोज मुंबईकडे जाणाºया अमरावती- मुंबई एक्स्प्रेसची स्थानिक राजापेठनजीकच्या वाशिंग युनिटवर नीट स्वच्छता करण्यात येत आहे. साहित्य ठेवण्याची जागा कटाक्षाने निर्जंतुक औषधाने स्वच्छ करीत आहे. डब्यांतदेखील औषध फवारणी केली जात आहे.
प्रवेशद्वारावर तिकीटबाबू
अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वारावरील गर्दी टाळण्यासाठी तिकीट निरीक्षकांना कर्तव्यावर ठेवले आहे. हातमोजे, मास्क लावून हे तिकीटबाबू कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे फुकट्या प्रवाशांवर अंकुश लागले आहे.