वळणावर घात झाला! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला, पाहा अंगावर काटा आणणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:04 IST2023-02-25T10:59:19+5:302023-02-25T14:04:08+5:30
जैनपूर येथील श्रमसंस्कार शिबिरातून परतताना अपघात

वळणावर घात झाला! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला, पाहा अंगावर काटा आणणारा Video
दर्यापूर (अमरावती) : शहरातील जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार विशेष शिबिराचे आयोजन जैनपूर येथे सात दिवसांपासून करण्यात आले होते. शुक्रवारी या शिबिराचा समारोप झाल्याने महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी हे ट्रॉलीमध्ये दर्यापूरला येत असताना विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू होती. दरम्यान, जैनपूर गावाबाहेरील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ट्राॅलीमधील २२ विद्यार्थी जखमी झालेत.
VIDEO: अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, २२ जण जखमी pic.twitter.com/6dEblSACpL
— Lokmat (@lokmat) February 25, 2023
अपघातानंतर सर्वं जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, १७ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविले असून २ ते ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. तिरुपती राठोड यांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या नातेवाईकानी एकच गर्दी केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणेदार संतोष ताले व पोलिस स्टाफने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विविध पक्षांच्या राजकीय मंडळींनींही उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली.