भांडायचे, रडवायचे अन् चौर्यकर्म फत्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 05:00 AM2022-06-13T05:00:00+5:302022-06-13T05:00:32+5:30

एकाच वेळी तीन महिलांनी ऑटो वा एसटी बसमध्ये बसायचे. आपसात भांडण करून, परस्परांना शिव्या देत अन्य प्रवाशांचे ध्यान आपल्याकडे वळवायचे, जवळ असलेल्या चिमुकल्यांना चिमटा घेऊन त्यांना रडवून सहानुभूती मिळवायची, महिलेशेजारच्या तिच्या पती वा नातेवाईकाला उठवून त्या महिलेजवळ स्वत: बसायचे अन् काम फत्ते करायचे, अशी त्यांची चोरीची पद्धत. अटक तीनही महिलांनी ती ‘मोडस ऑपरेंडी’ पोलिसांसमोर उलगडली.

To steal, to weep, to steal! | भांडायचे, रडवायचे अन् चौर्यकर्म फत्ते !

भांडायचे, रडवायचे अन् चौर्यकर्म फत्ते !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ऑटो तथा एसटीतील महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लांबविणारी ‘सुवर्ण टोळी’ गजाआड करण्यात ‘टीम गाडगेनगर’ला यश आले आहे. दुभाषाकडून आरोपींची कबुली समजून घेतल्यानंतर शनिवारी त्यांच्याकडून तब्बल १७४ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तीन महिलांना अटक केल्यानंतर त्यांच्या पाच पुरूष पाठीराख्यांना अटक करण्यात आली. त्यातून महिला आरोपींची चोरी करण्याची अफलातून पद्धत देखील उलगडली.
एकाच वेळी तीन महिलांनी ऑटो वा एसटी बसमध्ये बसायचे. आपसात भांडण करून, परस्परांना शिव्या देत अन्य प्रवाशांचे ध्यान आपल्याकडे वळवायचे, जवळ असलेल्या चिमुकल्यांना चिमटा घेऊन त्यांना रडवून सहानुभूती मिळवायची, महिलेशेजारच्या तिच्या पती वा नातेवाईकाला उठवून त्या महिलेजवळ स्वत: बसायचे अन् काम फत्ते करायचे, अशी त्यांची चोरीची पद्धत. अटक तीनही महिलांनी ती ‘मोडस ऑपरेंडी’ पोलिसांसमोर उलगडली. मेअखेर बॅग लिफ्टिंगच्या घटनांना अंजाम देणाऱ्या तीन चोर महिलांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले होते. त्या चोर महिलांनी पीसीआर दरम्यान दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील   पाचोरा येथील पाच पुरुष आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ११ गुन्ह्यातील फिर्यादींनी आरोपी महिलांना ओळखले. 

महिलांना नाही मोबाईलचा मोह
टोळीतील तीनही महिला चौर्यकर्म करतेवेळी स्वत:जवळ मोबाईल बाळगत नाहीत. ऑटो वा बस प्रवासादरम्यान महिलांकडून सोन्याचे दागिने वा रक्कम चोरल्यानंतर जवळच्या थांब्यावर उतरून तिघीही वेगवेगळ्या दिशेने जातात. तेथून एखाद्याकडून कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन आपल्या सहकारी पुरुषांना फोन करून आपले स्थळ कळवायचे. एका दिवशी एकच चोरी वा बॅगलिफ्टिंग करून रात्रीच्या वेळी भाड्याच्या खोलीत एकत्र यायचे, आपण विवाहित जोडपी आहोत, हे दाखविण्यासाठी आरोपी बडनेरा व लालखडी हद्दीत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. तसा या आठ आरोपींचा शिरस्ता असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले.

पाचोऱ्याचा आकाश मास्टरमाईंड
तीन महिलांसह विष्णू शंकर वैदू (२७), आकाश गोपाल वैदू (४०), कुमार शंकर वैदू (३५), आर्या गोपाल साखरे (३०) व सोनू गोपाल साखरे (२८, सर्व रा. पाचोरा, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आकाश वैदू हा ही टोळी संचालित करतो व तोच मास्टरमाईंड असल्याची माहिती आहे. गाडगेनगर पोलिसांनी विष्णू वैदूच्या घरातूनच १५० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. २४ ग्रॅमचा सोन्याचा गोफ देखील हस्तगत केला. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील ‘टीम गाडगेनगर’ने त्या चोरांकडून तब्बल ११ गुन्ह्यांची कबुली मिळविली.

 

Web Title: To steal, to weep, to steal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर