व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून सहायक प्राध्यापकाची रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:21 IST2025-03-25T11:10:50+5:302025-03-25T11:21:21+5:30
Amravati : सुसाइड नोटमध्ये ३४ जणांची नावे

Tired of management harassment, assistant professor commits suicide under train
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा (अमरावती) : धामणगाव रेल्वेस्थानकावर रविवारी मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास यवतमाळ येथील बापूजी अणे महिला महाविद्यालयातील एका सहायक प्राध्यापकाने मालगाडीखाली आत्महत्या केली. मृत सहायक प्राध्यापकाचे नाव डॉ. संतोष ऊर्फ आप्पा भास्करराव गोरे (वय ५६, रा. जयहिंद चौक, यवतमाळ) असे असून, ते बापूजी अणे महिला महाविद्यालयात कार्यरत होते. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून, त्यामध्ये त्यांनी व्यवस्थापनातील ३४ जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
बडनेरा रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताजवळ टाइप केलेली सुसाइड नोट सापडली आहे. महाविद्यालय व्यवस्थापनातील ३४ लोकांच्या नावासह त्यांच्या त्रासापायी मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख यामध्ये आहे. माझी संपूर्ण प्रॉपर्टी पत्नी, तसेच मुलीला मिळावी, असे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. धामणगाव रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या लागून असलेल्या रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला.
यवतमाळच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
प्रा. संतोष गोरे हे यवतमाळ येथे लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक होते. महाविद्यालयातीलच एका महिला सहकाऱ्याच्या तक्रारीवरून त्यांची चौकशी सुरू होती. यावरून ते तणावात होते. याच प्रकरणात महाविद्यालयाच्या समितीने तक्रारदार आणि प्रा. गोरे यांना समक्ष बसवून चर्चाही केली होती. मात्र, सोमवारी पहाटे गोरे यांनी धामणगाव रेल्वे येथे आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर यवतमाळच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. प्रा. संतोष गोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
"प्रा. संतोष गोरे यांच्याविरोधात महाविद्यालयातीलच एका महिला प्राध्यापिकेने तक्रार दिली होती. त्यावेळी प्रकरण मिटविले होते. मात्र, पुन्हा महिलेने तक्रार दिल्याने प्रा. गोरे यांना शोकॉज बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण महिला तक्रार निवारण समितीपुढे गेले होते. यानंतर गोरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. मात्र, त्यांची समजूत घालून राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यास सांगितले होते. शनिवारी महिला तक्रार निवारण समितीने त्यांना या प्रकरणात क्लीन चिटही दिली होती. मात्र, त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे कळायला मार्ग नाही."
- दुर्गेश कुंटे, प्राचार्य, अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ.