तस्करांच्या टार्गेटवर ९ राज्यांतील वाघ, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचा अलर्ट
By गणेश वासनिक | Updated: February 4, 2025 11:58 IST2025-02-04T11:56:21+5:302025-02-04T11:58:12+5:30
गतवर्षी १३ देशांच्या व्याघ्र शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार भारताने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केली.

तस्करांच्या टार्गेटवर ९ राज्यांतील वाघ, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचा अलर्ट
अमरावती : देशात ९ राज्यांतील वाघांना तस्करांनी टार्गेट केल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव गुन्हे संस्थेने ३४ व्याघ्र प्रकल्पांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. यात महाराष्ट्रातील सह्याद्री, ताडोबा आणि पेंच या व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे अस्तित्व जीवानिशी आले आहे. तर ९ राज्यांत किमान १८०० वाघांचे अधिवास आहेत. वाघांना धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे सहसंचालक डॉ. मनोज कुमार यांनी १ फेब्रुवारी रोजी व्याघ्र प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून अलर्ट केले आहे.
गतवर्षी १३ देशांच्या व्याघ्र शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार भारताने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केली. सध्या भारतात साधारणत: ४००० वाघांचे अस्तित्व आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा वाटा मोठा आहे. एकट्या भारतात वाघांचे ७३.७ टक्के अस्तित्व शाबूत आहे. मात्र भारतातील वाघांचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय तस्करांनी संपवून टाकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वाघांना शिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठी वनविभागाला परिश्रम घ्यावे लागेल, हे विशेष.
शेकडो वाघ टार्गेट
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांचे अवयव आणि कातडीला लाखोंची बोली लागते. त्यामुळे तस्करांनी देशातील ९ व्याघ्र प्रकल्पांना टार्गेट केले आहे. यात महाराष्ट्रातील सह्याद्री, पेंच, ताडोबा, गडचिरोलीचा समावेश आहे.
जिमकार्बेट गंगोत्री, राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड, अमनगढ, पिलीभित, वाल्मीकी नॅशनल पार्क उत्तर प्रदेश, बालाघाट, पेंच, मध्य प्रदेश, वेस्टर्न घाट म्हणजे गोवा, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ अशा ९ राज्यांतील व्याघ्र प्रकल्पात सुमारे १८०० वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशात १००० वाघ सध्या आहेत. उर्वरित वाघ ७ राज्यात आहेत.
वनक्षेत्रात गस्त वाढवा
वाइल्ड क्राईम ब्युरो संस्था ही सीबीआयच्या धर्तीवर वन्यजीव क्षेत्रात काम करते. या संस्थेने देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांना अलर्ट जारी केला.
व्याघ्र प्रकल्प, राखीव वनातील वाघ आंतरराष्ट्रीय तस्करांच्या ‘हिटलिस्ट’वर आले असून तातडीने संवेदनशील वनक्षेत्रात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रेल्वे स्टेशन, मंदिरे, बसस्थानक, पडक्या इमारती, सार्वजनिक क्षेत्र, डेरा-तंबू आदी ठिकाणे तपासा अशी सूचना जारी केली आहे. इतकेच नव्हे तर गुप्तहेरांची मदत घेऊन तस्करांच्या मुसक्या आवळा आणि पोलिसांना सोबत घेण्याचा ‘डब्ल्यूसीसीबी’चा अलर्ट आहे.
वाघांची संख्या वाढतेय
देहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था ही दर चार वर्षांनी वाघांची संख्या जाहीर करते.
गेल्या १९ वर्षांत वाघांची संख्या ४००० हजारांच्यावर पोहोचलेली आहे. भारतात वाघांची संख्या वाढतच आहे. सन २०२६ ची आकडेवारी एका वर्षाने समोर येईल.