थरारक! अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागात भावाने भरचौकात केले 'हे अमानुष कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 18:51 IST2021-08-27T18:50:35+5:302021-08-27T18:51:13+5:30
Amravati News अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अल्पवयीन भावाने तिच्या प्रियकराला जिवानिशी संपविले.

थरारक! अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागात भावाने भरचौकात केले 'हे अमानुष कृत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अल्पवयीन भावाने तिच्या प्रियकराला जिवानिशी संपविले. गाव शिवारात नेऊन त्याच्यावर चाकूने सपासप वार केले व दुचाकीवर परत गावात आणून भरचौकात फेकून दिले. ही थरारक घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. अक्षय ऊर्फ गुणवंत दिलीप अमदुरे (२२, रा. चांदूर रेल्वे) असे मृताचे नाव आहे. यात तीन अल्पवयीनांसह एकूण सहा जणांना कुºहा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( Inhumane act committed by brother in kidnapping of younger sister)
प्रेमप्रकरणातून चांदूर रेल्वे तालुक्यातील व कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमला विश्वेश्वर येथील एका अल्पवयीन मुलीला अक्षयने काही दिवसांपूर्वी पळवून नेले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मुलीने आम्ही मर्जीने गेलो होतो, असे बयाणात सांगितले होते. मात्र ती अल्पवयीन असल्याने अक्षय अमदुरेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
अशी घडली घटना
अक्षय अमदुरे हा गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास आमला विश्वेश्वर येथे आला. यात तो ज्या अल्पवयीन मुलीवर कथित प्रेम करत होता, तिच्या भावाला दिसला. आपल्या बहिणीला पळवून नेल्याचा राग त्याच्या मनात होता. आरोपीने दोन मित्रांना सोबत घेऊन अक्षयला दुचाकीने भिवापूर रस्त्यावर नेले. तेथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चाकूने सपासप वार केले. नंतर त्याला आमला विश्वेश्वर गावात आणून भरचौकात फेकून तेथेसुद्धा जबर मारहाण केली. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, नागपूरला नेताना रात्री १०.३० च्या सुमारास त्याचा तिवसानजीक मृत्यू झाला.
अक्षयला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जास्त रक्तस्त्राव होत असल्याने त्याला नागपुरात उपचारासाठी हलविण्यात आले असता, तिवसाजवळ त्याचा मृत्यू झाला. तीन अल्पवयीनांसह सहा जणांना ताब्यात घेतले. प्रेमप्रकरण व बहिणीला पळवून नेल्याच्या कारणातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
- ईश्वर वर्गे,
ठाणेदार, कुऱ्हा पोलीस ठाणे