कर्ज आणि नापिकीला कंटाळून तीन युवा शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 13:37 IST2022-10-10T13:04:37+5:302022-10-10T13:37:00+5:30
नापिकी आणि कर्जामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

कर्ज आणि नापिकीला कंटाळून तीन युवा शेतकऱ्यांची आत्महत्या
अमरावती/ यवतमाळ : नापिकी आणि कर्जामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आयुष्य संपविले. अचलपूर तालुक्यातील दोनोडा खैरी येथील युवा शेतकरी सतीश कमलदास मोहोड याने (३३) रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सततची नापिकी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची आर्थिक ओढाताण सुरू होती. सतीश मोहोड यांच्याकडे तीन एकर शेती होती. धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथील शेतकरी मंगेश दिगंबर खातखिडे (४०) रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
वडिलोपार्जित चार एकर जमीन मोठा मुलगा मंगेश हा सांभाळत होता. यावर्षी अतिपावसामुळे शेतातील संपूर्ण पीक पाण्याखाली होते. त्याच्या पश्चात आई- वडील आणि एक भाऊ आहे.
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथील विजेश प्रेमसिंग आडे (३३) याने शेतात विष घेतले. ही घटना ८ ऑक्टोबरला रात्री उघडकीस आली. त्याला दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृताच्या आईच्या नावे तीन एकर शेती असून, सततच्या नापिकी, सोसायटीचे कर्ज आणि खासगी कर्जाला कंटाळून विजेशने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.