पाणीपुरवठा नूतनीकरण : तीन वर्षांपासून रखडला प्रस्तावअंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहराची अपुरी पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सुजल निर्मल योजनेंतर्गत शासनाकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावांतर्गत तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. पण या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्राप्त न झाल्याने हा निधी परत गेला. आता पुन्हा नव्याने ‘नगर उत्थान’ योजनेंतर्गत अधिकाऱ्यांनी पाईपलाईन दुरूस्ती व पाणी टाकी बांधकामाचा प्रस्ताव सादर केला आहे. सन २०१२ मध्ये पाठविलेल्या मूळ प्रस्तावाची तीन वर्षे निघून गेल्यामुळे व नव्या प्रस्तावाला पुन्हा वर्षभर वेळ लागणार असल्याने शहराची पाणी समस्या मिटण्याची नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. नव्या प्रस्तावांतर्गत अस्तित्वात असलेली पाईप लाईन बदलण्यासोबतच वाढीव आकाराच्या नव्या पाईप लाईन टाकण्याचा समावेश आहे. शहराची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी व जेथे पाणी मिळत नाही. त्या भागाला सुरळीत पाणी देण्यासाठी टाकरखेडा नाका परिसरात नवीन पाणी टाकी बांधणे व खोडगाव नाका परिसरात असलेली ३५ वर्षांपूर्वीची जुनी टाकी पाडून त्या जागी नवीन टाकी बांधणे या कामाचासुद्धा या प्रस्तावात समावेश आहे. सन १९७५ पासून सुरू झालेल्या नळ योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने व त्याची क्षमता अपुरी पडत असल्याने शहराला गतकाळात होणारा अविरत पाणीपुरवठा मर्यादित करण्यात आला असून सध्या दररोज दोन पाळ्यांमध्ये पाणी देण्यात येते. शहरात सध्या अंदाजे दहा हजार नळ ग्राहक आहेत. सार्वजनिक नळ योजना बंद झाल्यामुळेसुद्धा वैयक्तिक ग्राहक वाढले आहेत. नवीन प्रस्ताव पारित होईपर्यंत बुधवारच्या बंद पाणी पुरवठ्यासह उन्हाळ्यातील पाणी टंचाईलासुद्धा नळ ग्राहकांना सामोरे जावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
सुजल निर्मल योजनेचे तीन कोटी रूपये परत गेले
By admin | Updated: January 4, 2016 00:16 IST