सराईत चोराकडून तीन दुचाकी जप्त; गाडगेनगर हद्दीतील तीन गुन्हे उघड
By प्रदीप भाकरे | Updated: April 13, 2023 17:45 IST2023-04-13T17:44:48+5:302023-04-13T17:45:42+5:30
गुन्हे शाखेची कारवाई

सराईत चोराकडून तीन दुचाकी जप्त; गाडगेनगर हद्दीतील तीन गुन्हे उघड
अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने १३ एप्रिल रोजी तपोवन परिसरातून अटक केली. चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मजहर खान नासिर खान (२६, रा. चमननगर, बडनेरा) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.
एक चोरटा तपोवन परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेने तपोवन परिसर गाठून मजहर खान याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील दुचाकीचोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार मजहर खानकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्यात.
मजहर खानकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राजकिरण येवले, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, नीलेश पाटील, चेतन कराडे, योगेश पवार, जगनाथ लुटे यांनी केली.