मेळघाटात परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर अवघ्या २४ तासांत तीन अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:07 IST2025-05-08T14:06:27+5:302025-05-08T14:07:55+5:30

Amravati : ट्रॅव्हल्सनंतर चारचाकी दरीत उतरली, आरटीओ वाहन झाडावर आदळले, सुदैवाने जीवित हानी नाही

Three accidents in just 24 hours on the Parthwada-Dharani-Khandwa route in Melghat | मेळघाटात परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर अवघ्या २४ तासांत तीन अपघात

Three accidents in just 24 hours on the Parthwada-Dharani-Khandwa route in Melghat

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा :
मंगळवारी सायंकाळी सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मांगिया गावानजीक अपघात झाल्यानंतर, कोलकासनजीक चारचाकी दरीत कोसळून त्यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले. बुधवारी सकाळी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सची तपासणी आणि चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या आरटीओच्या चारचाकी वाहनालाही अपघात झाला. यात चालकासह अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. २४ तासांमध्ये तीन अपघातांची मालिकाच परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर घडली. 


धारणी-परतवाडा मार्गावर सेमाडोहच्या भवई घाटात अमरावतीहून धारणीकडे जाणाऱ्या आरटीओ वाहनाला अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. खराब रस्त्यावर भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 


येथे चालते जीवघेणी शर्यत
परतवाडा-धारणी मार्गावर मध्य प्रदेशातून ये-जा करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात आहेत. यात प्रवासी गुरांसारखे कोंबून नेले जातात. एसटी बसपुढे प्रवासी मिळावे, यासाठी खासगी ट्रॅव्हल्सची जीवघेणी शर्यत रस्त्यावरची नेहमीच बघायला मिळते. 


पूर्वी पाच ठार आठवणीला उजाळा
याच मार्गावर सेमाडोहनजीक जवाहर कुंड पुलाखाली खासगी ट्रॅव्हल्स कोसळून पाच जण ठार झाले होते. जीवाचा थरकाप उडविणाऱ्या आठवणींचा उजाळा अनेकांना झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला अपघात पुन्हा झाल्याने यावर नियंत्रण कोणाचे, हा प्रश्न पुढे आला.


आणि रस्त्याने यम धावत होता...
मंगळवारी सायंकाळी ट्रॅव्हल्स कलंडण्यापूर्वी नागपूरहून बऱ्हाणपूरसाठी निघालेली ही खासगी ट्रॅव्हल्स मेन पट्टा तुटल्याने परतवाडा येथे दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे एक तास उशीर झाला. त्यावर नेमण्यात आलेल्या चालकाची घाटवळणाची पहिलीच वेळ असतानाही वेळ कापण्यासाठी तो भरधाव वेगाने वाहन चालवत होता. प्रवासी त्याच्यावर ओरडले, पण काहीही परिणाम झाला नाही. अखेर मांगियानजीकच्या वळणावर बस कोसळून अपघात झाला.

Web Title: Three accidents in just 24 hours on the Parthwada-Dharani-Khandwa route in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.