These rays are rainy .... farmer spread water on crops of cotton in farm of amravati | तू ये रे पावसा... कपाशीच्या बुडाशी चक्क अ‍ॅक्वाचं पाणी देतोय बळीराजा 
तू ये रे पावसा... कपाशीच्या बुडाशी चक्क अ‍ॅक्वाचं पाणी देतोय बळीराजा 

अमरावती : एकरी १२ हजार रुपये भाडे देऊन मक्त्याने कसण्यासाठी घेतलेल्या शेतात कपाशीचे पीक जगविण्यासाठी आष्टी येथील दिव्यांग शेतकरी अ‍ॅक्वाचे स्वच्छ पाणी रोपांना देत आहे. गतवर्षी याच शेतात २७ क्विंटल कपाशीचे उत्पादन घेतले; यंदा हे पीक पाणी येईपर्यंत जगले तरी खूप मिळविल्यासारखे होईल, असे हतबल होऊन या शेतकऱ्याने म्हटले. त्याच्या या प्रतिक्रियेतूनच अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील यंदाच्या पाऊसमानाच्या भीषण परिस्थितीचा प्रत्यय येत आहे. 

आष्टी (ता. अमरावती) येथील अल्पभूधारक शेतकरी नीलेश एकनाथराव ढोरे (३३) दिव्यांग आहेत. स्वत:च्या दीड एकर शेतात आई, पत्नी, चार वर्षाचा मुलगा यांची गुजराण शक्य नसल्याने गावालगतची तीन एकर शेती भाड्याने घेऊन तो कसत आहे. यंदा या जमिनीत कपाशीचा पेरा करण्यात आला. भाड्यापोटी एकरकमी ३६ हजार आणि बियाणे, पेरणी व मशागतीचे आठ हजार असे ४४ हजार रुपये आधीच शेत-माऊलीच्या उदरात टाकणाऱ्या नीलेशची पावसाने खोडा टाकताच जमिनीतून वर आलेले पीक जगविण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. 

अमरावती शहरापासून २६ किमी अंतरावर असलेले आष्टी परिसर हा खारपाणपट्ट्याचा. त्यामुळे सिंचनाची सुविधाच नाही. त्यात जास्त पाणी झाल्यास जमीन चिबड होते. याशिवाय पाण्यात क्षार असल्याने ओलीत केल्यास जमीन क्षारपड होण्याचा धोका आहे. त्यामुळे घरी असलेल्या अ‍ॅक्वा उद्योगात तयार झालेले पाणी शेतात नेऊन पिकांना देण्याची कल्पना नीलेश ढोरे यांनी प्रत्यक्षात आणली. कपाशीला तीन चाकांची सुविधा असलेल्या दुचाकीवर कॅन चढवून त्यांच्यासह पत्नी डिंपल पाणी देत आहेत, तर कधी नातेवाइकाच्या ट्रॅक्टरवर टाकी चढवून पाइपने प्रत्येक रोपाच्या बुडाशी पाणी देण्यात येते. 
अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा होत आहे. ज्यांना शक्य आहे, ते स्प्रिंकलर व इतर मार्गाने सिंचनातून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांना नशिबाचा हवाला देत स्वस्थ बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. भीषण दुष्काळातच आता दिवसा उन्हाचे चटकेही वाढले आहेत. 

पाऊस ७ जुलैपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तेव्हापासून रोपांना पाणी देण्याचे काम करीत आहे. पावसाळा पुन्हा सुरू होईपर्यंत या रोपांनी पावसाचा ताण सहन केला तरी दुबार पेरणीचा खर्च टळेल, असे भावनिक उद्गार निलेश यांनी काढले.  
- निलेश ढोरे, आष्टी, ता. अमरावती.
 


Web Title: These rays are rainy .... farmer spread water on crops of cotton in farm of amravati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.