काय सांगता? चिखलदऱ्यात 28 दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:12 AM2022-07-27T09:12:43+5:302022-07-27T09:13:27+5:30

विदर्भाचे नंदनवन, मेळघाटचे काश्मीर अशा एक ना अनेक नावाने ओळख असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर कधी चेरापुंजीची आठवण करून देणारा, तर क्षणात तुषार कोसळणारा पाऊस पडत आहे

There is no sunlight in the muddy valley for 28 days in chikhaldhara | काय सांगता? चिखलदऱ्यात 28 दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही

काय सांगता? चिखलदऱ्यात 28 दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (जि. अमरावती) : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर मागील २८ दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. पावसाने  एक हजार मिलिमीटरचा आकडा गाठला असून, जून, जुलै या दोन महिन्यांत लाखांवर पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे नगरपालिकेला रग्गड महसूल प्राप्त झाला आहे. कधी मुसळधार, तर कधी रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे कोसळू लागले आहेत. पांढरे शुभ्र दाट धुके त्यात हे स्वर्ग हरवल्याचे दृश्य मोहीत करणारे ठरले आहे.

विदर्भाचे नंदनवन, मेळघाटचे काश्मीर अशा एक ना अनेक नावाने ओळख असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर कधी चेरापुंजीची आठवण करून देणारा, तर क्षणात तुषार कोसळणारा पाऊस पडत आहे. त्यात चिंब होण्यासाठी वीकेंडसह इतर दिवसही पर्यटक गर्दी करीत आहेत. शेकडो फूट उंचावरून कोसळणारे धबधबे आणि हिरवा गालिचा पांघरलेल्या गगनचुंबी टेकड्या पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात.
पावसाने हो-नाही म्हणता उशिरा लावलेली हजेरी पाहता, आता थांबता थांबेना म्हणायची वेळ चिखलदरावासीयांवर आली आहे. २८ दिवसांत एकदाही सूर्यदर्शन झाले नसल्याने, दररोजच्या वापराचे कपडेही वाळत नसल्याने स्थानिक नागरिकही कंटाळले आहेत. उबदार कपडे आणि शेकोटीवजा चुलीवर ऊब घेत आहेत.  पर्यटकांसाठी ती पर्वणी ठरत आहे. 

एक हजार मिमी पावसाची नोंद
चिखलदऱ्यात आतापर्यंत कोसळलेल्या एकूण पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा गाठला आहे. त्यामध्ये १० जून ६५ मिमी, १० व १३ जुलै  प्रत्येकी ७९ मिमी, १८ जुलै ८५ मिमी,१९ जुलै ९५ मिमी, तर २५ जुलै ७० मिमी अशी पावसाची नोंद आहे.
चिखलदरात २८ दिवसांपेक्षा अधिक काळापासून सूर्याचे दर्शन झाले नाही. सततचा पाऊस, दाट धुके आणि ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे परिसर गारठला आहे. 
- अरुण तायडे, सभापती, 
न. प., चिखलदरा

Web Title: There is no sunlight in the muddy valley for 28 days in chikhaldhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.