चांदूर रेल्वे उपविभागातील ५६ गावांमध्ये पोलिस पाटीलच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 14:15 IST2025-04-26T14:14:29+5:302025-04-26T14:15:39+5:30

वाद मिटतील कसे ? : तंटामुक्ती समिती कागदोपत्रीच, चांदूर उपविभागातील गावांची स्थिती

There is no police chief in 56 villages of Chandur railway subdivision. | चांदूर रेल्वे उपविभागातील ५६ गावांमध्ये पोलिस पाटीलच नाही

There is no police chief in 56 villages of Chandur railway subdivision.

मोहन राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे :
उपविभागातील ५६ गावांमध्ये तीन वर्षापासून पोलिस पाटील नसल्याने पोलिस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. पोलिस पाटील ग्रामपातळीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यात अतिमहत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहून पोलिस पाटील तत्काळ संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधतात. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा वाढणारा ताण कमी होतो. मात्र, तीन तालुक्यातील तब्बल ५६ गावांमध्ये पोलिस पाटील नसल्याने गावातील अनेक महत्त्वपूर्ण गोपनीय बाबींची माहिती मिळत नाही. 


या घटनांकडे पोलिस पाटील ठेवतात लक्ष
गौण खनिज चोरीच्या घटना, अवैध रेती उपसा, गावातील अवैध धंदे, अदखलपात्र गुन्हे आणि कौटुंबिक कलह यासारख्या अनेक बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिस पाटलांकडे आहे. पोलिस पाटील हे गावाच्या सुरक्षेचे महत्त्वाचे पद आहे. गावपातळीवरील प्रभावी अंमलबजावणी करीत असतात; परंतु थामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील ५६ गावांमध्ये पोलिस पाटील पद रिक्तच आहेत. त्यामुळे अवैध व्यवसाय वाढले आहेत. यामुळे पोलिस पाटील पद भरणे गरजेचे आहे.


धामणगाव रेल्वे तालुक्यात १६ गावांचा अतिरिक्त पदभार
काशीखेड, चिचोली, मिर्झापूर, तुळजापूर, गुंजी, घुसळी, मलातपूर, नारगांवडी, वडगाव राजदी, कासारखेड, नागापूर, दिपोरी, झाडगाव, वाघोली, जळगाव आर्वी, विरुळ रोंघे या गावात अनेक वर्षांपासून पोलिस पाटील नाहीत. त्यामुळे अतिरिक्त कारभार इतर पोलिस पाटलांना सांभाळावा लागत आहे. 


पोलिस पाटील महत्त्वाचा दुवा
गावातील वाद रोखण्याचे काम पोलिस पाटील करीत असतात. गावामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत होत असते. सण, उत्सव या काळात ग्रामस्थ व प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असतो.


नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील २४ गावांची अवस्था गंभीर
जगतपूर, मोखड, धानोरा जोग, अजनी, शहापूर, शेलुगुंड, नांदुराबाद, टिमटाळा, जयसिंगा, धानोरा गुरव, टाकळी गिलबा, अडगाव बु., लोहगाव, सिद्धनाथपूर, खेडपिंपरी, जनुना, खरबी गुंड, शेलू नटवा, मुंडवाडा, नांदसांवगी, सुलतानपूर, बेलोरा, सावनेर या गावात पोलिस पाटील पद रिक्त असल्याने या गावाचा कारभार रामभरोसे आहे.


१६ पदे रिक्त चांदूर रेल्वे तालुक्यात
निमला, एकलारा, शिरजगाव कोरडे, धानोरा म्हाली, धोत्रा, कारला, सांगूनवाडा, कवठा कडू, सावंगी संगम, निभा, दानापूर (मा.), सातेफळ, इब्राहिमपूर, मोगरा, चांदूरखेडा गावांमध्ये पोलिस पाटील


"तिन्ही तालुक्यातील पोलिस पाटील पदे रिक्त असून इतर गावातील पोलिस पाटलांकडे पदभार दिला आहे. संबंधित गावातील पोलिस पाटील पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शासनाच्या निर्देशानुसार लवकरच ही पदे भरण्यात येतील"
- तेजस्विनी कोरे, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे

Web Title: There is no police chief in 56 villages of Chandur railway subdivision.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.