लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉटरीआड चालणारा ऑनलाइन जुगार, स्पाआड देहविक्री, एमडीची तस्करी, बनावट दारू यासह एरिया ९१ रेस्टो बारमध्ये फेक वेडिंगचा इव्हेंट होतो, अल्पवयीन मुले-मुली एकत्र येतात, धिंगाणा घातला जातो आणि तो थेट राज्याच्या विधिमंडळात गाजतो. मात्र, ही गंभीर बाब यंत्रणेला कळू नये, याबाबत आश्चर्य आहे. त्यामुळे खुपिया यंत्रणा आहे तरी कुठे, समाजात पोलिसांचा धाक संपला का? अशी विचारणा करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस प्रशासनाला खडेबोल सुनावले.
अमरावती शहरातील ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यस्थेवर 'लोकमत'ने सातत्याने प्रशासनाने लक्ष वेधले होते. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १९ जुलै रोजी यंत्रणांचा आढावा घेतला, हे विशेष. तासभर चाललेल्या या बैठकीत बानवकुळे यांनी नागरिकांच्या तक्रारींना 'सिरीअस' घ्या. त्यांच्या प्रश्न, समस्या गांभीर्याने सोडवा, असे निर्देश देताना ना. बावनकुळे यांनी गोवंश तस्करीवर अंकुश लावणे, पोलिसांनी नागरिकांशी सुसंवाद ठेवणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे, मीडियासोबत संवाद वाढविणे आदी मुद्द्यांवर फोकस होता. विशेषतः वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आ. चंदू यावलकर, आ. प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात एमडी तस्करीअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात एमडी तस्करी होत असताना त्याचे पाळेमुळे का नष्ट केले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जुगार, वरली मटका यासह अनेक अवैधधंदे सुरू असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होत असताना प्रशासनाने अॅक्शन घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. अलीकडे अमरावतीत खून होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून याकडे जातीने लक्ष द्यावे. कठोर कारवाई करा, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी पोलिस यंत्रणेला सांगितले.
गुन्हेगारी थांबवा, वाळू तस्करी रोखाअमरावती हे सांस्कृतिक शहर आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये, असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे यांनी ग्रामीण भागातील वाळू तस्करी थांबली पाहिजे, असा कानमंत्र दिला. गुन्हेगारी फोफावल्यास गाठ माझ्याशी आहे, असेही ते म्हणाले. पोलिसांनी नागरिकांमध्ये जाऊन सुसंवाद साधला. सोशल अॅक्टिव्हिटी वाढवा त्याद्वारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य मिळेल, असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केला.