घरात चोरी, दानपेटीही पळवली, अखेर चोराच्या हाती पडली बेडी; दोन गुन्ह्यांची दिली कबुली
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 5, 2023 18:02 IST2023-09-05T17:39:31+5:302023-09-05T18:02:08+5:30
कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

घरात चोरी, दानपेटीही पळवली, अखेर चोराच्या हाती पडली बेडी; दोन गुन्ह्यांची दिली कबुली
अमरावती : खापर्डे बगिचा परिसरात दोन नागरिकांच्या घरातून रोख रक्कम व मोबाइल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारला अटक केली. त्याच्याकडून ३,९३० रुपये जप्त करण्यात आले.
दिनेश वासुदेव भारसाकळे (४६) (रा. निंभी चिनका, अकोला) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. खापर्डे बगिचा येथे राहणारे युवराज प्रकाश राठोड (३०) यांच्या उघड्या घरातून चार हजार रुपये रोख लंपास करण्यात आले होते. त्याचप्रमाणे याच परिसरात राहणारे चंदन केशवराव भारती (४०) यांच्या घरातून दोन मोबाइल व मंदिरातील दानपेटी असा २८ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
तपासात सदर गुन्ह्यांत दिनेश सहभागी असल्याचे समोर आल्यावर त्याला अटक करून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सदर दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून ३ हजार ९३० रुपये रोख जप्त करण्यात आले. ही कारवाई कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, शिरीष सावरकर, प्रकाश मिसाळ, सतीश खंडारे, मंगेश दिघेकर, मोहम्मद समीर यांनी केली.