अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात

By गणेश वासनिक | Updated: September 5, 2025 14:33 IST2025-09-05T14:00:44+5:302025-09-05T14:33:10+5:30

Amravati : मानव-वन्यजीव संघर्ष वाढतोय; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू

The state tops the country in tiger attacks; 218 out of 378 deaths in the country are in Maharashtra alone | अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात

The state tops the country in tiger attacks; 218 out of 378 deaths in the country are in Maharashtra alone

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जागतिक स्तरावर वाघांच्या संख्येत भारत अव्वलस्थानी असला, तरी वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढत आहे. सन २०२० ते २०२४ या कालावधीत देशभरात वाघांच्या हल्ल्यात तब्बल ३७८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात २१८ मृत्यू झाले आहेत. विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मृत्यूची आकडेवारी सर्वाधिक आहे. तर मेळघाटात गेल्या तीन वर्षात सहा जणांचे बळी गेले आहेत.

राज्यात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, मेळघाट, बोर व सह्याद्री, असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. तर, ४८ अभयारण्ये असून, ४ संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. व्याघ्र प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने वाघांनी नवा कॉरिडॉर शोधला असून, नजीकच्या राखीव जंगलाच्या दिशेने त्यांनी मुक्काम हलविल्याने मानव-वन्यजीव संघर्ष होत असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

वाघांचे मृत्यूही वाढले

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या मृत्यूची संख्याही वाढलेली आहे. विविध कारणांमुळे वाघांचा मृत्यू होत आहे, ज्यात नैसर्गिक मृत्यू, दोन वाघांमधील संघर्ष आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारे अनैसर्गिक मृत्यू, शिकार, अपघात, विद्युतधक्का आदींचा समावेश आहे. 

मानव-वन्यजीव संघर्ष या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहेत. मानवी वस्तीजवळ फिरणाऱ्या वाघांवर लक्ष ठेवणे, त्यांना पुन्हा जंगलात सोडणे आणि लोकांना यासंदर्भात जागरूक करणे, ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे.
आदर्श रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

गत पाच वर्षांत वाघांच्या मृत्यूची आकडेवारी (स्रोत : राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण)
२०२० - १०६
२०२१ - १२७
२०२२ - १२१
२०२३ - १७८
२०२४ - १२४
जानेवारी-एप्रिल २०२५ : ६२ (यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक २० मृत्यू नोंदवले गेले आहेत.)


देशात वाघांच्या हल्ल्यात ३७८ मानवी मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी सर्वाधिक २१८ मृत्यू महाराष्ट्रात झालेत.
वर्ष                  मानवी मृत्यू
२०२०                   ५१
२०२१                   ५९
२०२२                  ११० (यापैकी महाराष्ट्रात ८२)
२०२३                  ८५
२०२४                  ७३

Web Title: The state tops the country in tiger attacks; 218 out of 378 deaths in the country are in Maharashtra alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.