रक्षक झाला भक्षक! धाकटीचे हातपाय बांधून वडिलाचा मोठीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2023 22:47 IST2023-03-11T22:47:06+5:302023-03-11T22:47:31+5:30

Amravati News ज्याने आधार द्यायचा व रक्षण करायचे त्या वडिलानेच आपल्या धाकट्या मुलीचे हातपाय बांधून मोठ्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुली या अल्पवयीन आहेत.

The protector became the predator! Father tortures the elder by tying the hands and feet of the younger | रक्षक झाला भक्षक! धाकटीचे हातपाय बांधून वडिलाचा मोठीवर अत्याचार

रक्षक झाला भक्षक! धाकटीचे हातपाय बांधून वडिलाचा मोठीवर अत्याचार

अमरावती : ज्याने आधार द्यायचा व रक्षण करायचे त्या वडिलानेच आपल्या धाकट्या मुलीचे हातपाय बांधून मोठ्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुली या अल्पवयीन आहेत.

पोलिस सूत्रांनुसार, बापाने मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आली आहे. पतीला सोडून पत्नी वेगळी राहायला गेल्यानंतर तीनपैकी दोन मुली पतीकडे, तर एक मुलगी पत्नीकडे होती. मजुरीचे काम करणाऱ्या वासनांध पित्याने सप्टेंबर २०२२ मध्ये निद्रावस्थेत असलेल्या मुलींपैकी मोठ्या मुलीची छेडखानी केली. त्याचवेळी धाकट्या मुलीला जाग आला. तिने परिस्थितीचे भान ठेवून पित्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परोपरीने समजाविले. मात्र, बापाने या धाकट्या मुलीचे हात-पाय बांधले आणि मोठ्या मुलीवर तिच्यासमोर अत्याचार केला. जिवे मारण्याच्या धमकीमुळे दोन्ही मुली घाबरल्या होत्या. धैर्य एकवटून त्यांनी पोलिस ठाणे गाठले. नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अन्य एका घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने १ जानेवारी ते २ मार्च दरम्यान अत्याचार केला. १० मार्चला माहुली जहागीर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार, जेव्हा ती शाळेत जायची तेव्हा आरोपी तिचा पाठलाग करीत असे. पीडितेची आई घराबाहेर गेली तेव्हा संधी साधून त्याने पीडितेच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने ही माहिती कुटुंबीयांना देताच पोलिस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. पोलिसांनी पोक्सो व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला.

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाड्याने राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला होळीला रंग लावण्याच्या बहाण्याने घरमालकाच्या मुलाने खोलीत शिरून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना ७ मार्चची आहे. १० मार्चला गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, ६ मार्चला रूम पार्टनर बाहेरगावी गेली असल्याने घरमालकाने पीडिताला आपल्या मुलीसोबत झोपण्यास सांगितले, तर त्याचा मुलगा तिच्या खोलीत निद्राधीन झाला. ७ मार्चला दुपारी तो मुलगा रंग लावण्याच्या बहाण्याने खोलीत आला. दरवाजा बंद करून त्याने अत्याचार केला. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The protector became the predator! Father tortures the elder by tying the hands and feet of the younger