अमरावती : जिल्ह्यातील २० केंद्रांवर सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात येत आहे. १२ जानेवारीला खरेदीची मुदत संपल्याने केंद्र शासनाच्या एमएल पोर्टलचे ई-समृद्धी ॲप बंद करण्यात आले. प्रत्यक्षात ३१ जानेवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ॲप बंद असल्याने सोयाबीन खरेदी कशी करावी, हा पेच निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाने आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदीला १२ जानेवारी डेडलाइन दिल्याने त्या दिवशी एमएल पोर्टलचे ई-समृद्धी ॲप बंद करण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी केंद्र व राज्य शासनाने सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. जिल्ह्यात सुरू असलेल्या २० केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करायची असल्यास संबंधित शेतकऱ्यांना मेसेज द्यावा लागतो व त्यानंतरच केंद्रांवर आलेल्या सोयाबीनची खरेदी करण्यात येते. मात्र, ही यंत्रणाच बंद असल्याने केंद्रांवरून संबंधित तकऱ्यांना मेसेज गेलेले नाही. मंगळवारी ॲप बंद असल्याने शेतकऱ्यांना मेसेज न गेल्याने बुधवारीदेखील खरेदी शक्य नसल्याचे वास्तव आहे. हे पोर्टलवर मंगळवारी सुरू होत असल्याबाबत डीएमओ व व्हीसीएमएफ यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बारदाना शिल्लक बारदाना नसल्याने सोयाबीनची खरेदी राहिली, असा प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही. सद्य:स्थितीत डीएमओकडे ४३ हजार बॅग शिल्लक आहे. तीन दिवसांत पुन्हा एक लाख बारदाना उपलब्ध होत आहे. मुदतीत साधारणपणे ५० किलोंसाठी १.४० लाख बारदाना लागण्याची शक्यता आहे.
नोंदणीतील होणार खरेदी व्हीसीएमएफ किंवा डीएमओच्या यांच्या अधिकृत २० केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच मेसेज मिळेल. एकूण नोंदणीकृत ९५८७ शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी ३१ जानेवारीच्या आत करण्याचे आव्हान आहे.
"खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली. ॲप सुरू झाल्यानंतर नोंदणी केलेल्या; परंतु खरेदी बाकी असलेल्या शेतकऱ्यांना मेसेज देण्यात येईल." - अजय बिसने, जिल्हा विपणन अधिकारी