लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली. राज्य सरकारने सातबारा कोरा करण्याचा जो शब्द दिला होता, तो त्यांनी खरा करावा, अन्यथा आम्ही मंत्रालयात शेतकऱ्यांसह घुसू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चांदूर नाका येथे प्रहारकडून शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग, कर्मचाऱ्यांचे न्याय्य मुद्द्यांवर गुरुवारी सकाळी ८ पासून अचलपूर-परतवाडा-अमरावती मार्गावरील चांदूर नाका येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू स्वतः या चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. ते म्हणाले, शासनाच्या मागणीवर थातूरमातूर निर्णयावर आम्ही थांबणार नाही. यापेक्षा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनामुळे सकाळपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. १० पोलिस अधिकारी, ५५ कर्मचारी व एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक रम्मी खेळून कृषिमंत्र्यांचा निषेध नोंदविला.
बेलोरा येथे चक्का जामबेलोरा : चांदूर तालुक्यातील बेलोरा या माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मूळ गावी सकाळी दहा वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा करावा, अशी मागणी प्रहार कार्यकर्त्यांनी केली.