भावाकडे महालक्ष्मीला आलेल्या बहिणीसह तिघांना उडविले, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:04 IST2023-09-22T10:56:13+5:302023-09-22T11:04:12+5:30
जुना धामणगाव बायपास जवळील घटना, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

भावाकडे महालक्ष्मीला आलेल्या बहिणीसह तिघांना उडविले, दोघे गंभीर
धामणगाव रेल्वे (अमरावती) : महालक्ष्मी सणासाठी पाहुणपणाला आलेल्या तिघांना एका चारचाकी वाहनाने बुधवारी रात्री ८ च्या सुमारास उडविल्याची घटना जुना धामणगाव बायपासजवळ घडली. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
प्रीती नीलेश बेंद्रे (३०), पती नीलेश बेंद्रे (३५) व मुलगी दिव्या (७, सर्व रा. भुसावळ) अशी जखमींची नावे आहेत. जुना धामणगाव परिसरातील सारंगनगर येथील शेखर जगताप यांच्याकडे त्यांची बहीण प्रीती व कुटुंबीय महालक्ष्मी सणासाठी पाहुणपणाला आले होते. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घरून शेखर यांच्या दुकानाकडे येत असताना एमएच २७ डीए ९२६१ क्रमांकाच्या वाहनाच्या चालकाने या तिघांना उडविले.
प्रीती बेंद्रे या गर्भवती आहेत. तिघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रथम धामणगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे करीत आहेत.