अमरावतीतील 'द फेक वेडिंग'; अल्पवयीनांना मद्य पुरविल्याप्रकरणी मालक, आयोजकांविरुद्ध 'पोक्सो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:35 IST2025-07-18T12:33:10+5:302025-07-18T12:35:38+5:30

मालकाला एक दिवसाची पोलिस कोठडी : पोलिस आयुक्तांनी दिले निर्देश

'The Fake Wedding' in Amravati; 'POCSO' against the owner, organizers for supplying liquor to minors | अमरावतीतील 'द फेक वेडिंग'; अल्पवयीनांना मद्य पुरविल्याप्रकरणी मालक, आयोजकांविरुद्ध 'पोक्सो'

'The Fake Wedding' in Amravati; 'POCSO' against owner, organizers

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
येथील शंकरनगरस्थित हॉटेल 'एरिया ९१' रेस्ट्रो बार आयोजित 'द फेक वेडिंग' इव्हेंटदरम्यान रंगलेल्या मद्यपार्टीतून सुमारे ७५ ते ८० टिनएजर्सना पोलिसांनी 'झिंगलेल्या' स्थितीत ताब्यात घेतले होते. त्यातील ४० अल्पवयीन मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील चार अल्पवयीन मुले मद्याच्या अमलाखाली आढळून आली होती. १३ जुलै रोजी रात्री ती कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मूळ दाखल गुन्ह्यात गुरुवारी 'पोक्सो' कलमान्वये वाढ केली. तथा मालक आनंद भेले याला अटक करून त्याची एक दिवसाची पोलिस कोठडी देखील मिळविली. 


गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ती कारवाई केली होती. 'एरिया ९१' रेस्ट्रो बारमध्ये हॉटेल मालक व आयोजकांनी 'फेक वेडिंग' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी बारमध्ये काही अल्पवयीन मुलामुलींना प्रवेश देऊन त्यांना दारू सर्व्ह केली जात असल्याची माहिती पीआय संदीप चव्हाण यांना मिळाली होती. तेथे तिसऱ्या मजल्यावर बारच्या आत १५० ते १७५ मुले व मुली डान्स करताना व असभ्य वर्तन करून शांतता व सार्वजनिक व्यवस्थेचा भंग करताना दिसून आले. त्यामध्ये काही अल्पवयीन मुले व मुली हे दारूच्या अमलाखाली डान्स करताना दिसून आले. 


यांच्याविरुद्ध दाखल होते गुन्हे
रेस्ट्रो बारचा मालक आनंद राजू भेले (वय ३३, रा. समर्थ हायस्कूलमागे, अमरावती) व आयोजक सॅम हेमंत बजाज (१९, रा. अनुपनगर, अमरावती) व त्याच्या अन्य चार अल्पवयीन साथीदारांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, (बाल न्याय) मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलमान्वये राजापेठ पोलिस ठाण्यात सोमवारी पहाटे गुन्हा दाखल केला होता. मात्र, आरोपींनी अल्पवयीन मुलांना जाणूनबुजून दारू पुरविली गेली. त्यांना व्यसनाच्या गर्तेत ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे उघड झाल्याने सीपी अरविंद चावरिया यांनी राजापेठ पोलिसांना दाखल गुन्ह्यात पोक्सो कायद्यातील कलमवाढ करण्याचे निर्देश दिले होते.


"अल्पवयीन मुलामुलींना बारमध्ये अवैधरीत्या प्रवेश देऊन त्यांना पिण्याकरिता मद्याचा पुरवठा केल्याचे स्पष्ट झाले. सबब, फेक वेडिंगचे आयोजक व मालकाविरुद्ध दाखल गुन्ह्यात पोक्सोअन्वये कलमवाढ करण्यात आली."
- अरविंद चावरिया, पोलिस आयुक्त

Web Title: 'The Fake Wedding' in Amravati; 'POCSO' against the owner, organizers for supplying liquor to minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.