नवरीची वरात निघाली घोड्यावरून; गावकऱ्यांची उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 19:58 IST2023-05-22T19:57:36+5:302023-05-22T19:58:04+5:30
Amravati News वराची वरात निघते घोड्यावरून. त्यावेळी त्याची ऐटही पाहण्याजोगी असते. तथापि, तिवसा येथील एका वधूपित्यानेही आपल्या मुलीची चक्क घोड्यावरून वरात काढली.

नवरीची वरात निघाली घोड्यावरून; गावकऱ्यांची उसळली गर्दी
संदीप राऊत
अमरावती : वराची वरात निघते घोड्यावरून. त्यावेळी त्याची ऐटही पाहण्याजोगी असते. तथापि, तिवसा येथील एका वधूपित्यानेही आपल्या मुलीची चक्क घोड्यावरून वरात काढली. तिवसा येथील नागरिकांनी २० मे रोजी हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला.
नववधू स्वीटी ऊर्फ क्रांती दीपक बन्नोरे हिच्या लग्नानिमित्ताने तिच्या आई-वडिलांनी परंपरेला फाटा देत संपूर्ण तिवसा शहरातून घोड्यावरून वाजतगाजत तिची वरात काढली. पुरोगामी विचारसरणीला अनुसरून स्वीटीच्या आई-वडिलांनी घोड्यावर स्वार होण्याचा मान आपल्या लाडक्या लेकीला दिला. घोड्यावर बसलेल्या या नववधूला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. शहरातीलच प्रवीण निकाळजे या मुलासोबत स्वीटीची लग्नगाठ बांधण्यात आली. २१ मे रोजी नवदाम्पत्य विवाहबंधनात अडकले. शहरात पहिल्यांदाच निघालेल्या आगळ्यावेगळ्या वरातीचे व आई-वडिलांच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुकही केले.