अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाने एका चार वर्षांच्या बालकाच्या आयुष्यात नवा प्रकाश आणणारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जन्मजात मूकबधिर असलेल्या या मुलावर शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी कॉक्लियर इम्प्लांट ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, या रुग्णालयातीलच नव्हे तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातीलदेखील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे मूत्रपिंड विभाग, प्लास्टिक सर्जरी, बालरोग विभाग, हृदयरोग विभाग, कॅन्सर विभाग, मेंदूरोग विभाग कार्यान्वित असून अनेक गंभीर रुग्णांवर येथे उपचार होत आहेत. अशातच आता जन्मताच मूकबधिर असलेल्या बालकांवर क्वाॅक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेलादेखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता.
मात्र, सामान्य कुटुंबांसाठी खर्च परवडणारा नसल्याने अनेक मुलांचे आयुष्य अंधारातच राहत होते. अमरावतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशी शस्त्रक्रिया होणे म्हणजे गरिबांसाठी वरदानच ठरले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया ईएनटीतज्ज्ञ डॉ. जीवन वेदी, डॉ. मंगेश मेंढे, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. शीतल सोळंके, डॉ. अश्विनी मडावी डॉ. रमनिका, डॉ. उज्ज्वला मोहोड यांनी यशस्वी केली. आया शस्त्रक्रियेनंतर आता बालक हळूहळू आवाज ऐकण्यास सक्षम होईल आणि येत्या काळात बोलायलाही शिकेल, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
दोन वर्षांनंतर मुलगा बोलत नसल्याचे आले लक्षात
सदर मुलगा हा दोन वर्षांचा झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना लक्षात आले की, आपला मुलगा ऐकू शकत नाही व बोलूही शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्या बाळावर अनेक उपचार केले. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर या बाळावर क्वॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्पीच थेरेपी घेऊन बाळ येणार मुख्य प्रवाहात
ही शस्त्रक्रिया गंभीर श्रवणशक्ती कमी असलेल्या बालकांसाठी केली जाते. हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आहे. यात एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण कानाच्या आत बसविले जाते ज्याचा संपर्क मेंदूतील नस सोबत येतो, त्यामुळे कर्णबधिर व्यक्तीस आवाज ऐकणे शक्य होते. ही शस्त्रक्रिया केल्यामुळे जन्मजात श्रवणबाधित बालकांचा भाषा व वाचा विकास सामान्य मुलाप्रमाणे होऊन ते किमान दोन वर्षांनी स्पीच थेरपी घेऊन मुख्य प्रवाहात येतात.
"सार्वजनिक आरोग्य विभागातील पहिली क्वॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया ही विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात झाली आहे. खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यासाठी दहा लाखांच्या जवळपास खर्च येतो. तसेच हा मुलगा साडेचार वर्षांचा असल्याने त्याची शस्त्रक्रिया कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे."- डॉ. मंगेश मेंढे, विशेष कार्य अधिकारी, सुपर हॉस्पिटल
Web Summary : Amravati hospital successfully performed cochlear implant surgery on a deaf child, a first for Maharashtra's public health sector. The surgery, costing lakhs privately, was free, offering hope to many families. The child will now undergo speech therapy.
Web Summary : अमरावती के अस्पताल ने एक बधिर बच्चे पर सफल कॉक्लियर इंप्लांट सर्जरी की, जो महाराष्ट्र के सार्वजनिक स्वास्थ्य क्षेत्र में पहली है। लाखों की सर्जरी मुफ्त में की गई, जिससे कई परिवारों को उम्मीद मिली। बच्चा अब स्पीच थेरेपी लेगा।