अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा
By प्रदीप भाकरे | Updated: October 19, 2022 18:52 IST2022-10-19T18:52:21+5:302022-10-19T18:52:46+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा
अमरावती : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश ए.एस. काझी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. जितेंद्र विलास कडू (३२, वाडेगाव, ता. वरूड) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
विधीसुत्रानुसार, १९ जुलै २०१७ रोजी वाडेगाव येथे ही घटना घडली. एक महिला व पिडिता या घरकाम करत असताना आरोपीने तिच्या घरात दार तोडून प्रवेश केला. त्याने फिर्यादी महिलेच्या पतीशी वाद घातला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला काठीने देखील मारले. त्याला सोडवायला महिला व अल्पवयीन मुलगी सरसावले असता आरोपीने त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल केला आहे. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील मंगेश भागवत यांनी चार साक्षीदार तपासले. साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षा सुनावली. तीनही कलमांअंतर्गत सुनावलेल्या शिक्षा आरोपीला एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधीकरणास पिडितास योग्य तो मोबदला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय राजेंद्र बायस्कार व नापोकॉ अरूण हटवार यांनी काम पाहिले.