पुसला येथे बाजार चिठ्ठी फाडण्यावरुन तणाव
By Admin | Updated: January 7, 2016 00:35 IST2016-01-07T00:35:03+5:302016-01-07T00:35:03+5:30
स्थानिक आठवडी बाजारात चिठ्ठी फाडण्यावरून उद्भवलेला वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी मध्यरात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.....

पुसला येथे बाजार चिठ्ठी फाडण्यावरुन तणाव
चार जणांविरुध्द गुन्हे दाखल : गल्ला फेकण्यावरून उद्भवला वाद, पोलीस कुमक तैनात
पुसला : स्थानिक आठवडी बाजारात चिठ्ठी फाडण्यावरून उद्भवलेला वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी मध्यरात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांची अतिरिक्त कुमक याठिकाणी तैनात करावी लागली. वरीष्ठ पोलीस अधिकारी येथे रात्रभर तळ ठोकून होते. दरम्यान हजारो नागरिकांनी पोलीस चौकीत जाऊन चिठ्ठी वसूलकर्त्याला अटक करण्याची मागणी केली होती. महिला सरपंचाच्या पतीलासुध्दा वसुली करणाऱ्याने ओढताण केल्याने हा प्रकार घडला. तूर्तास येथे शांतता आहे.
येथील आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या दुकानदारांकडून चिठ्ठी वसुलीचे कंत्राट माणिक डोंगरे यांना ग्रामपंचायतीने दिल आहे. यामुळे सदर बाजारचिठ्ठीची वसुली डोंगरे परिवार करते. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती. सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बाजार चिठ्ठी वसूलकर्ताने एका दुकानदाराला चिठ्ठीचे पैसे मागितले. त्याने चिल्लर नसल्याने १०० रुपयांची नोट दिली. परंतु वसुलीकर्त्याने थेट पैशांच्या गल्ल्यात हात घालून गल्ला फेकला. यावरुन वाद निर्माण झाला आणि तो विकोपाला गेला.
थोड्याच वेळेत कंत्राटदार डोंगरे यांचे संपूर्ण कुटुंब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली. ही घटना ग्रामस्थांना कळताच गावातून शेकडो लोक बाजारात पोहोचले. तेवह सरपंचाचे पती सुनील चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चा सुरु असतांनाच सरपंच चिमोटे यांना आरोपींनी ओढताण करुन मारहाणीचा प्रयत्न केला. यामुळे वाद आणखीच चिघळला.
घटनेची माहिती मिळताच शेंदूरजनाघाटचे ठाणेदार अशोक लांडे यांच्या पोलीस पथकाने पुसला गाठले. वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु परिस्थीती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून वरुड, मोर्शी, बेनोडा तसेच एस.आर.पी जवानांना पाचारण करण्यात आले. हजारो नागरिकांनी पोलीस चौकीसमोर जाऊन चिठ्ठी कंत्राटदाराला अटक करण्याची मागणी केली.
घटनेची तीव्रता पाहून अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मकानदार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गवई, ठाणेदार अशोक लांडे, बेनोडाचे ठाणेदार मुकुंद ठाकरे, अर्जून ठोसरे यांनी रात्रभर तळ ठोकून गावभर गस्त केली. मारहाण झालेल्या दुकानदार प्रफुल्ल गणेश खडगे २ २ रा. पुसला यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल रामकिसन डोंगरे (५२), प्रदीप रामकिसन डोंगरे, रोशन राजेंद्र डोंगरे यांच्या विरुध्द भादंविच्या कलम ३२४,५०४,५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तर सरंपचाचे पती सुनील चिमोटे यांच्या फिर्यादीवरुन जनार्दन डोंगरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारीला सकाळी १० वाजताचे दरम्यान उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी पुसला येथे भेट देऊन चौकशी केली. तणावाच्या वातावरणामुळे बाजारातील दुकानदारांनी पळ काढल्याने माल जागीच पडून राहिल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले बुधवारी गावात तणावपूर्ण शांतता कायम होती. गावकऱ्यांमध्ये या घटनेबाबत विविध चर्चांना उत आला होता. चिठ्ठी वरून उदभवलेल्या वादामुळे हा प्रकार घडला. आठवडी बाजारातील दुकानदारांची यामुळे मोठी हानी झाली. (वार्ताहर)