अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
By प्रदीप भाकरे | Updated: December 20, 2025 00:17 IST2025-12-20T00:17:06+5:302025-12-20T00:17:56+5:30
शंकर नगर, गोपाल नगरात वाहनांची तोडफोड, केडिया भागात काहींना मारहाण

अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
अमरावती: खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर येथील गोपाल नगर, शंकर नगर, केडीया नगर व आदिवासी नगर या भागामध्ये २० ते २५ जणांच्या टोळक्याने यथेच्छ धुडगूस घातला. हाती लाठ्याकाठ्या व शस्त्र घेऊन त्यांनी पाच ते सहा कार, १५ ते २० दुचाकींची तोडफोड केली. शंकर नगर, राजापेठ व नवाथे भागात काही दुकानांमध्ये शिरून ती दुकानेही जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय चाकूच्या धाकावर दहशत माजवण्यात आली.
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी डॅम परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या मंथन पालनकर या १९ वर्षीय तरुणाची चार हल्लेखोरांनी चाकूने भोसकून हत्या केली. त्याप्रकरणी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नांदगाव पेठ पोलिसांनी गोपाल नगर येथील तीन हल्लेखोर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास २० ते २५ जणांच्या टोळक्याने प्रथम केडीया नगर, त्यानंतर आदिवासी नगर, पुढे शंकर नगर व गोपाल नगर परिसरात चाकूच्या धाकावर दहशत माजवली. शंकर नगर परिसरातील गोल्ड जिम भागातील दोन कारची तोडफोड करण्यात आली. पुढे शंकर नगर भागात काही दुचाकींचे नुकसान करण्यात आले. आदिवासी नगर भागामध्ये काही घरांवर दगडफेक देखील करण्यात आली. ते टोळके मृताचे समर्थक असल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे ज्या तीन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले, त्यात आरोपींच्या समर्थकांचाही त्यात समावेश असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र त्याबाबत पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. याबाबत राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी दहशत माजवणाऱ्या टोळीतील १० जणांना ताब्यात घेतले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शंकर नगर, आदिवासी नगर, केडियानगर, गोपाल नगर आदी भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर अनेक नागरिकांनी आपापल्या घराची दारे बंद केली.
रात्री दहाच्या सुमारास तो तणाव निवळला. पोलीस उपायुक्त शाम घुगे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी गोपाल नगर शंकर नगर भागाला भेट दिली. आमदार रवी राणा यांनीदेखील गोल्ड जिमजवळील घटनास्थळ गाठून विचारणा केली. हल्लेखोरांना ताब्यात घेण्याचे निवेदन पोलिसांकडे करण्यात आले आहे.