गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, मोर्शी तालुक्यातील २०१५ च्या घटनेवर दिला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 18:34 IST2017-12-16T18:34:19+5:302017-12-16T18:34:55+5:30
पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, मोर्शी तालुक्यातील २०१५ च्या घटनेवर दिला निर्णय
अमरावती - पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (५) विमलनाथ तिवारी यांच्या न्यायालयाने शनिवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. धर्मेंद्र चरणसिंह उईके (४८, रा. धानोरा, मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
विधी सूत्रानुसार, मोर्शीतील मलीनपूर रोड स्थित अजित जोशी यांच्या शेतात मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवासी इसम सालदार म्हणून काम करीत होता. त्याच्यासमवेत पत्नी व चिमुकला असे कुटुंब जोशी यांच्या शेतातील खोलीत राहत होते. १३ ऑगस्ट २०१५ रोजीच्या मध्यरात्री सालदार शेताची देखरेख करीत होता, तर पत्नी व मुलगा खोलीत झोपले होते. यावेळी धर्मेंद्र उईके शेतात शिरला. सालदाराने त्याला हटकले असता, तो जुमानला नाही. त्यामुळे सालदार शेतमालकाला माहिती देण्यास गेला. दरम्यानच्या काळात धर्मेंद्रने खोली शिरून सालदाराच्या पत्नीला ओढत दुसऱ्या खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शेतमालक व सालदार तेथे पोहोचले. ते दोघेही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी धर्मेंद्रविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या प्रकरणाचे तपासकार्य पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश (५) विमलनाथ तिवारी याच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता एस.बी. पल्लोड (आसोपा) यांनी नऊ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने धर्मेंद्र उईकेला दहा वर्षांचा सश्रम कारावास, दोन हजाराचा दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली, तर भादंविच्या कलम ५०६ मध्ये निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणात पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून संतोष बावने यांनी कामकाज पाहिले.
घटनेच्या दीड महिन्यानंतर पीडितेचा मृत्यू
सालदाराच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांतच पीडित महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पोटाचा विकार असल्याचे पतीने पोलिसांना सांगितले होते. पीडिताचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. अशा प्रकारणामध्ये पहिल्यादांच आरोपीला शिक्षा झाली आहे.