शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा - सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 15:12 IST2023-03-04T15:12:43+5:302023-03-04T15:12:52+5:30
अचलपूर येथे शिवगर्जना अभियानांतर्गत त्या जाहीरसभेत बोलत होत्या

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा - सुषमा अंधारे
अचलपूर (अमरावती) : भारतीय जनता पक्ष कटकारस्थानाचे व फोडाफोडीचे राजकारण करून शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही हाडामासाचे शिवसैनिक आहात. तो प्रयत्न भाजपचा हाणून पाडा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अचलपुरात जाहीर सभेत केला. चौधरी मैदान, अचलपूर येथे शिवगर्जना अभियानांतर्गत त्या जाहीरसभेत बोलत होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर घणाघाती आरोप केला. भारतीय जनता पक्ष स्वार्थाचे राजकारण करतेय. त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही घेणे-देणे नाही, असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना सोबत घेतले, त्या नेत्यांना संपविले आहे. राजू शेट्टी, सदा खोत, महादेव जानकर यांना जवळ करून त्यांचे राजकारण संपविले. महाराष्ट्रात ज्यांनी भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याकरिता आपले आयुष्य पणाला लावले, त्या गोपीनाथ मुंडे यांची लेक पंकजा मुंडे यांनासुद्धा संपविण्याचा घाट घातला. त्यांना बाहेर केले. आता फडणवीस बच्चू कडू यांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेने बच्चू कडू यांना मंत्री केले, तरीपण ते शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी बंद पडलेली फिनले मिल, शेतमालाला भाव, महागाईचा मुद्दा उपस्थित करीत भाजप शासनाला धारेवर धरले. सगळे फुटलेले आमदार, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे स्वप्न बघत आहेत. पण, मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीच हे सरकार कोसळणार आहे, असे त्या म्हणाल्या
कार्यक्रमाचे संचालन अभिजित काळमेघ यांनी केले. मंचावर माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी नगराध्यक्ष सुनीता फिसके, नरेंद्र पडोळे, बंडू घाेम, सुधीर सूर्यवंशी उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.