TD injection instead of TT | टीटी ऐवजी टीडी इंजेक्शन
टीटी ऐवजी टीडी इंजेक्शन

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयात मिळणार मोफत : धनुर्वातासोबत घटसर्पाची लस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारी टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्याऐवजी आता धनुर्वात आणि घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे.
गत काही वर्षांपासून १० आणि १६ वर्षे वयोगटात घटसर्पाचे (डिप्थेरिया) प्रमाण जास्त आढळून आल्याने आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. ही लस सर्व गरोदर मातांना तथा १० व १६ वर्षाच्या मुलांना सर्व शासकीय रुग्णालयात मोफत मिळणार आहे. या लसमध्ये धनुर्वात लसीचे प्रमाण पूर्वीसारखे जास्त असून, घटसर्पचे प्रमाण कमी असणार आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये धनुर्वात प्रतिबंधक म्हणजे टीटीची लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. आतार्यत गर्भवती तथा १० व १६ वर्षाच्या मुलांना टीटी लस नियमित लसीकरणामध्ये दिली जायची. त्यानंतर टीटी ऐवजी टीडी दिली जाणार आहे तसेच नियमित लसीकरणामध्ये धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प हिपॅटायटीस आणि इन्फ्लूएंझा एच, इन्फ्लूएंझ बी या पाच आजारांवर एकत्रित लस म्हणजेच पेंटाव्हॅलेट लस यापूर्वी दिली जात आहे. तसेच गोवर-रूबेलाची एकत्रित लस सध्या दिली जात आहे.
संयुक्त लस दिल्यामुळे वारंवार सुई टोचण्यापासून लहान मुलांची सुटका झाली आहे. दीड आणि पाच वर्षांच्या मुलांना डीपीटी ही लस ही दीड आणि साडेतीन महिने, दीड वर्ष, पाच वर्ष, साडेपाच वर्षाच्या मुलांना दिली जाते. त्यामुळे घटसर्पविरोधी लस या मुलांना मिळते.
पाच ते १६ वर्षांपुढील मुलांमध्ये घटसर्प या आजाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे टीटी ऐवजी टीडी लस देण्याची सृूचना केंद्र शासनाने दिली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
डब्ल्यूएचओची सूचना
घटसर्पाची लस पाच वर्षापर्यंतच्या मुलांना सहज मिळते. मात्र, पाच ते १० वर्षे आणि १० ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये घटसर्प या आजाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने धनुर्वातासह टीटी आता घटसर्प डिप्थेरिया ही संयुक्त लस देण्याची सूचना केली. सध्या १० आणि १६ वर्षाच्या मुलांंना तथा गरोदर मातांना टीटी ऐवजी टीडी ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लशीतून दोन्ही आजारांना प्रतिबंध होणार आहे.


Web Title: TD injection instead of TT
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.