वर्ग ५, ७ वीच्या तुकड्या जोडण्यास स्थगिती द्या
By Admin | Updated: May 3, 2017 00:26 IST2017-05-03T00:26:00+5:302017-05-03T00:26:00+5:30
जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सरसकट वर्ग ५ व वर्ग ८ च्या तुकड्या जोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात यावी,

वर्ग ५, ७ वीच्या तुकड्या जोडण्यास स्थगिती द्या
अमरावती : जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सरसकट वर्ग ५ व वर्ग ८ च्या तुकड्या जोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदनाद्वारे केली असता विनंती प्रमाणे कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
राज्यातील बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना कुठलीही अंतराची अट न मानता वर्ग ५ व वर्ग ८ च्या तुकड्या जोडण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण अधिकार कायद्यातील कलम ४, पोटकलम १ मधील क नुसार १ किमीच्या आत इयत्ता ५ वीचे शिक्षण घेण्याची व्यवस्था नसेल, अशा ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला ५ वीची तर ख नुसार ३ किमीच्या आत इयत्ता ८ वी मध्ये प्रवेशाची सुविधा नसेल तर जि. प. च्या ७ वी पर्यंतच्या शाळेला ८ वीची तुकडी जोडण्याची तरतूद आहे. उपरोक्त तरतुदीत बसणाऱ्या जि. प. शाळांना ५ वी व ८ वीच्या तुकड्या जोडण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळांनी सन २०१५-१६ मध्ये अशा तुकड्या जोडल्या नाहीत, त्यांनी शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये ५ वी व ८ वीची तुकडी सुरू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार ही व्यवस्था केली आहे. बेकायदेशीररित्या वर्ग ५ व वर्ग ८ च्या तुकड्या जि. प. शाळेला जोडल्याचे आढळून येत आहे. खासगी अनुदानित शाळा व नव्यानेच अनुदानावर आलेल्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होतील. शिक्षकांचे समायोजन न झाल्यामुळे त्यांचे जीवन उद्धवस्त होईल, असे होऊ नये यासाठी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना सरसकट वर्ग ५ व वर्ग ८ च्या तुकड्या जोडण्यास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्र्यांना केली आहे.