पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जीवावर बेतला; विचारणा करायला गेला अन खून झाला
By प्रदीप भाकरे | Updated: March 10, 2026 14:59 IST2026-03-10T14:58:30+5:302026-03-10T14:59:29+5:30
Amravati : नैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात उघडकीस आली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Suspecting his wife's immoral relationship, he risked his life; went to inquire and was murdered
अमरावती: अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात उघडकीस आली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आज मंगळवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी, बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायसोनी कॉलेजसमोरील मसला गावाजवळ एका पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृताची ओळख पटली असून, सूरज पुसुलाल यादव (वय ३१ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा धानसोड (गोंदिया) येथील रहिवासी असून सध्या मसला, बडनेरा येथील विटाभट्टीवर कामगार म्हणून कार्यरत होता.
गुन्हे शाखेने मृताच्या नातेवाईकांकडे आणि विटाभट्टीवरील इतर कामगारांकडे सखोल चौकशी केली. तपासात असे समोर आले की, मृताला त्याच्या पत्नीचे आरोपीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून काल रात्री ९ मार्च रोजी ९ ते १० च्या सुमारास मृत सूरज यादव आणि आरोपी अनिल शिव धुर्वे यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्याने संतापलेल्या अनिल धुर्वे याने सूरजला जमिनीवर पाडले आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी संशयावरून अनिल धुर्वे (वय ३५ वर्षे, रा. मोहडोंगरी, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.