आश्चर्यच....! बिबट्या जिन्याच्या पायऱ्या चढून चक्क एसआरपीएफ कार्यालयात आला, सीसीटीव्हीत कैद

By गणेश वासनिक | Updated: June 22, 2025 18:41 IST2025-06-22T18:41:02+5:302025-06-22T18:41:23+5:30

सीसीटीव्हीमध्ये कैद, शनिवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनीटांची घटना, शिकारीसाठी फिरला पण काही नाही भेटलं तर परतला

Surprise....! A leopard climbed the stairs and entered the SRPF office, caught on CCTV in Amravati | आश्चर्यच....! बिबट्या जिन्याच्या पायऱ्या चढून चक्क एसआरपीएफ कार्यालयात आला, सीसीटीव्हीत कैद

आश्चर्यच....! बिबट्या जिन्याच्या पायऱ्या चढून चक्क एसआरपीएफ कार्यालयात आला, सीसीटीव्हीत कैद

अमरावती: बिबट्याच्या नागरी वस्तीत संचार ही बाब अमरावतीकरांसाठी काही नवीन नाही. मात्र शनिवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनीटांनी एक बिबट शिकार शोधण्यासाठी चक्क अमरावती येथील राज्य राखीव पोलिस दल क्रमांक ९ च्या दुमजली इमारतीत कार्यालयात चक्क फेरफटका मारुन गेला. जिन्यावरून पायऱ्या चढत मोठ्या दिमाखदारपणे इमारतीत फिरणारा हा बिबट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर रविवारी वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने एसआरपीएफचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, परंतु बिबट कुठेच दिसून आला नाही.

अमरावती विद्यापीठ, राज्य राखीव दल, वडाळी परिसर, तपोवन, संजय गांधीनगर, मंगलधाम कॉलनी आदी नागरी वस्तीचा भाग हा वडाळी वनपरिक्षेत्राच्या जंगलालगत आहे. त्यामुळे या भागात अधूनमधून बिबट आढळून येतो. अमरावती विद्यापीठ परिसरात तर बिबट्याचे वास्तव्य ही नित्याचीच बाब आहे. असे असले तरी बिबट्याने मनुष्याला हानी पोहोचवली, अशी एकही घटना गेल्या पाच ते सहा वर्षात निदर्शनास आली नाही. नागरी वस्तीत शिकारीसाठी येणे आणि सावज शोधले की परत जंगलात जाणे हा बिबट्याचा नेहमीचा शिरस्ता आहे. अशाच प्रकारे शनिवारी मध्यरात्री बिबट शिकारीसाठी एसआरपीएफ कार्यालयात आले असावे, असा अंदाज वन विभागाच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख अमोल गावनेर यांनी लोकमत' बोलताना व्यक्त केला आहे.

शनिवारी मध्यरात्री बिबट एसआरपीएफ कार्यालयाच्या ईमारतीत फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्याकरिता रेस्क्यू पथक घटनास्थळी पाठविले होते. मात्र त्य भागात बिबट दिसला नाही. तो लगतच्या अमरावती विद्यापीठाच्या भिंतीवरून विद्यापीठ परिसरातील झुडपामध्ये गेला असावा.
- वर्षा हरणे, आरएफओ, वडाळी.

एसआरपीएफ परिसरात बिबट्याचा अनेकदा संचार
राज्य राखीव पोलिस दल वसाहत परिसरात गत काही वर्षांपासून अनेकदा बिबट येतो आहे. लगतच असणाऱ्या वडाळी, पोहरा जंगल परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल परिसराला लागून असणाऱ्या काही निवासस्थानाजवळ सायंकाळीसुद्धा बिबट दिसून येतो. झुडपात, एखाद्या खड्ड्यात बिबट दडून बसतो. राज्य राखीव पोलिस दल वसाहतीमधील अनेक कुत्र्यांची शिकार बिबट्यांनी केली आहे. तपोवन परिसरात डॉक्टर कॉलनी येथे १५ जूनला बिबट्याने गेटवरून घराच्या आवारात उडी घेत कुत्र्याची शिकार केली होती.

एसआरपीएफ परिसरात फिरणारा बिबट आता कार्यालयाच्या इमारतीत शिरला. तेव्हा येथे कर्तव्यावर असणारे कर्मचारी सुदैवानं त्याच्या समोर आले नाहीत म्हणून मोठा अनर्थ टाकला. कर्मचारी वसाहत परिसरात महिला, लहान मुलांमध्ये बिबट्याची दहशत आहे.
- मनीष घोडेस्वार, पोलिस उपनिरीक्षक एसआरपीएफ

Web Title: Surprise....! A leopard climbed the stairs and entered the SRPF office, caught on CCTV in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.