विद्यार्थ्यांची पायपीट ! परीक्षा देण्यासाठी करावा लागतोय २७ किलोमीटरचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:23 IST2025-02-16T11:22:06+5:302025-02-16T11:23:50+5:30
गटशिक्षणाधिकारी म्हणतात, कुणाकडूनही तक्रार नाही : यंदाही तळेगाव मोहना येथील विद्यार्थी कोळविहीर सेंटरला

Students' walk! They have to travel 27 kilometers to take the exam.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार: इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून तालुक्यातील तळेगाव मोहना येथील शाळेचे परीक्षा केंद्र यंदाही मोशी तालुक्यातील कोळविहीर येथे देण्यात आल्याने तालुक्यात शिक्षण विभागाच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यामध्ये बारावीची १० परीक्षा केंद्रे असून तळेगाव मोहना येथील शाळेचे परीक्षा केंद्र हे शिरसगाव बंड येथे होते. मात्र, गतवर्षी अचानक मोर्शी तालुक्यातील कोळविहीर येथे परीक्षा केंद्र देण्यात आले. तळेगाव मोहना येथील विद्यार्थ्यांना २७ किलोमीटरचा प्रवास करावा लागला. यंदाही तीच स्थिती बारावीच्या विद्यार्थ्यांवर आली आहे. या तुघलकी कारभाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न पालक वर्ग उपस्थित करीत आहेत.
परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी धावपळ
यंदाही तळेगाव मोहना येथील बारावीच्या विद्यार्थ्यांना कोळविहीर येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परंतु या केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागते.
जवळच्या केंद्रांकडे दुर्लक्ष
तळेगाव मोहनानजीक चांदूर बाजार तालुक्यातीलच शिरजगाव बंड, रजगाव बंड, चांदूर बाजार, शिरजगाव कसबा, करजगाव व आसेगाव अशी जवळची केंद्रे आहेत. परंतु ही केंद्र देण्यात आलेली नाही.
"शाळा स्थापन झाली तेव्हापासून आमच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र हे शिरसगाव बंड राहत होते. मात्र, मागील वर्षांपासून काहीही माहिती न देता आमच्या शाळेचे परीक्षा केंद्र हे कोळविहीर येथे देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे."
- राहुल गवई, मुख्याध्यापक, तळेगाव (मो)
"परीक्षा केंद्रे ही बोर्डातून ठरतात. तालुक्यातील तळेगाव मोहना येथील शाळेचे परीक्षा केंद्र हे मोर्शी तालुक्यातील कोळविहीर येथे दिले आहे. यासंदर्भात पालक किंवा विद्यार्थ्यांची तक्रार आलेली नाही."
- वकार अहमद खान, गटशिक्षणाधिकारी,
२७ किमी अंतरावर परीक्षा केंद्र, वेळेत पोहचणार कसे ?
तळेगाव मोहना ते कोळविहीर असे २७ किमी ये-जा करण्यासाठी बारावीची परीक्षा देणाऱ्या ३७ विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.