‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, गुणपत्रिकाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST2020-12-03T05:00:00+5:302020-12-03T05:00:28+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३ नोव्हेंबरपासून अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका व्यवस्थित आहे, अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. परंतु, सुमारे ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अप्राप्त असल्याने निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले. दुसरीकडे महाविद्यालयांनी पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची तारीख निश्चित केली आहे. गुणपत्रिकाच नसल्याने प्रवेश कसा मिळेल, ही समस्या आहे.

‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, गुणपत्रिकाच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याने गुणपत्रिका मिळाल्या नाही. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमात प्रवेश कसा घ्यावा, ही चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे. काही महाविद्यालयांनी प्रवेशाची अंतिम तारीख ४ डिसेंबर निश्चित केल्यामुळे गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३ नोव्हेंबरपासून अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका व्यवस्थित आहे, अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. परंतु, सुमारे ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अप्राप्त असल्याने निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले. दुसरीकडे महाविद्यालयांनी पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची तारीख निश्चित केली आहे. गुणपत्रिकाच नसल्याने प्रवेश कसा मिळेल, ही समस्या आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वयाचा अभाव नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
‘त्या’ कॉलेजवर कारवाई करा
विद्यार्थ्यांना निकाल रखडल्याने विद्यापीठ गाठावे लागत आहे. अंतिम वर्षाचा निकाल अन्य सत्राच्या गुणपत्रिका जमा न झाल्याने जाहीर करता येत नाही. विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असल्याबाबत गुणपत्रिका जमा न करणाऱ्या महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना मागणीचे निवेदन सादर केले.
पदवीसाठी ग्रेड निश्चित करावा लागतो. त्यामुळे मागील सत्राच्या गुणपत्रिका गोळा केल्या जात आहेत. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ
विद्यापीठात १० वाजता पोहोचण्यासाठी घरून मुलींसोबत सकाळी ६ वाजता निघालो. काही मुली पालकांविना आल्या आहेत. मुलींच्या अन्य सत्राच्या गुणपत्रिका जमा करूनही निकाल रोखला आहे.
- प्रमोद ठाकरे, देऊळगाव राजा
विद्यापीठ आणि महाविद्यालयांत समन्वयाचा अभाव आहे. सोबतच्या काही मित्रांचे प्रवेश झाले. त्यामुळे आता विद्यापीठाने प्रवेशास मुदतवाढ द्यावी.
- विश्वजित साेळंके, विद्यार्थी