विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून काढावा लागतो जिवघेणा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:01 IST2024-08-05T11:00:40+5:302024-08-05T11:01:32+5:30
Amravati : नदीवर पूल नाही, पावसाळ्यात बेलगंगा वाहते दुथडी

Students have to wade their way out of the flood water
मनोहर मुरकुटे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चौसाळा येथे शिक्षण घेणाऱ्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे दुथडी भरून वाहणाऱ्या बेलगंगा नदीच्या पुरातून मार्ग काढावा लागत आहे. हा प्रकार जिवावर बेतणारा ठरू शकतो. भरपावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा होऊन जनजीवन ठप्प होते. या नदीवर पुलाची मागणी कैक वर्षापासून नागरिक करीत आहेत.
चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ विद्यालय हे या परिसरात एकमेव नामांकित विद्यालय आहे. निमखेड बाजार, हिरापूर, खिराडा, चिंचोना, सावरपाणी, खिरपाणी या गावातील विद्यार्थी येथे येतात. त्यांना चौसाळा ते निमखेड बाजार मार्गाने बेलगंगा नदीपात्रातून वाट काढावी लागते. पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात पुरातूनच ये-जा करावी लागते. गेल्या चार-पाच दिवसांपासून बेलगंगावरील सावरपाणी येथील धरण भरल्याने नदीला पूर आहे. जवळपास या पाण्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.
एकीकडे पूर, दुसरीकडे काटेरी झुडपे
"चौसाळा ते निमखेड बाजार मार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गाच्या दोन्ही कडांवरील काट्यांची झुडपे आहेत. नागरिकांना या काटेरी झुडपांचे फटके खातच मार्गक्रमण करावे लागते. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर विद्यार्थ्यांना त्यातून मार्ग काढून शाळा गाठावी लागते. चौसाळा निमखेड बाजार रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मार्गी लावावा."
- विजय तिजारे, निमखेड बाजार
"मी नवीनच रुजू झाल्यामुळे लवकरच प्राथमिकदृष्ट्या काय उपाययोजना करता येतील, त्या मी स्वतः पाहणी करून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे."
- तेजस तंबाखे, उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, दर्यापूर