कर्जमाफीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष
By Admin | Updated: March 31, 2017 00:11 IST2017-03-31T00:11:29+5:302017-03-31T00:11:29+5:30
याच भूमीतून इंदिराजींना व काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळाली होती. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संघर्ष सुरू आहे.

कर्जमाफीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष
यशोमती ठाकूर : चांदा ते बांदा संघर्षयात्रेची तिवस्यात झंझावती सभा
तिवसा : याच भूमीतून इंदिराजींना व काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळाली होती. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संघर्ष सुरू आहे. कर्जमाफी ही फक्त उत्तर प्रदेशातच झाली पाहिजे, महाराष्ट्रात का नको, शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, त्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करू, असे अभिवचन आ. यशोमती ठाकूर यांनी दिले.
या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे चांदा ते बांदा यादरम्यान सुरू असलेली संघर्ष यात्रा गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात दाखल झाली व तिवसा येथील पेट्रोलपंप चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी आ. ठाकूर यांनी यात्रेची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम, रणजित कांबळे, वसुधा देशमुख, खा. नीतेश राणे, आ. वीरेंद्र जगताप, अमित झनक, अबू आझमी, सुनील केदार, अमर काळे, जितेंद्र आव्हाड, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, केवलराम काळे, माया चवरे आदी उपस्थित होते.
कर्जमाफीपर्यंत अविरत संघर्ष
अमरावती : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधिमंडळ सभागृहात सातत्याने शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली. याआधीच्या अधिवेशनांमध्येही कर्जमाफीच्या मागणीवर विरोधक ठाम राहिले, मात्र तरीही सरकार ढिम्म असल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष हा आता महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात लढला जाणार आहे.
४ एप्रिलपर्यंत या मागणीसाठी गावागावांत रान पेटविले जाणार आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष कदापिही सहन केले जाणार नाही, हाच संदेश उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी, युनायटेड जनता दल, रिपाइं (कवाडे गट), एआयएमआयएम आदी पक्षांची संघर्ष यात्रेचे तिवसा येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर व सर्व विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. यशोमती ठाकूर या सामान्य कार्यकर्त्यांसमवेत कार्यक्रम स्थळी मंचासमोरील भागात बसल्या होत्या. यावेळी सिद्धार्थ वानखडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाचे मिमिक्रीद्वारे वाभाडे काढले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन शहजाद पटेल यांनी केले. (प्रतिनिधी)