तणावामुळेच वाढल्या पोलिसांच्या आत्महत्या

By Admin | Updated: May 12, 2015 00:04 IST2015-05-12T00:04:23+5:302015-05-12T00:04:23+5:30

नागरिकांचे सुरक्षा कवच म्हणून कर्तव्य बजावणारा पोलीस कर्मचारी आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. सद्यस्थितीत पोलिसांचे ...

Stress increased police suicides | तणावामुळेच वाढल्या पोलिसांच्या आत्महत्या

तणावामुळेच वाढल्या पोलिसांच्या आत्महत्या

व्यथा : पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनाचे वास्तव
सुरेश सवळे चांदूरबाजार
नागरिकांचे सुरक्षा कवच म्हणून कर्तव्य बजावणारा पोलीस कर्मचारी आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. सद्यस्थितीत पोलिसांचे जीवन व्यस्त झाले आहेत. कामाचे अतिरिक्त तास यामुळे बहुतांश पोलीस कर्मचारी हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधींनी ग्रस्त आहेत. यामुळे त्यांच्या मध्ये व्यसनाधिनता वाढल्याची दिसून येते. बेरचदा त्यांना सतत ४८ तासापर्यंत आपले कर्तव्य बजावावे लागते. यात थोडीफार चूक झाल्यास वरिष्ठ अपमानित करतात, आणि निलंबनाची तलवार त्यांचे मानेवर तयार ठेवतात.
सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पैसे खाणारा, शिव्या हासडणारा अशी पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिमा नागरिकांच्या मनात आहे. परंतु याच्या दुसऱ्या बाजूचा विचार सामान्य नागरिकांसह सरकार करताना दिसत नाही. त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा विचार केल्यास आजही ग्रामीण भागातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न शासनाकडून सुटलेला नाही. १० बाय १० च्या जीर्ण निवासस्थानात तो आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास असतो. अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बरेचदा एखाद्या प्रकरणाची चौकशी करीत असताना त्याकरिता कागद, घटनास्थळावर जाण्याकरिता लागणारे वाहन, पेट्रोल याकरिता स्वत:च पैसे खर्च करावे लागतात. आरोपी कोठडीमध्ये असल्यास त्यांच्या जेवणाचा खर्चही तपास अंमलदारास करावा लागतो. याकरिता लागणारा खर्च जरी शासनाकडून मिळत असला तरी तो वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. एखादी दुर्घटना झाल्यास पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहचले नाही, तर त्याची आरडाओरड होते. परंतु ते का पोहोचू शकले नाही, याचा विचार केला जात नाही. कायदा व सुव्यवस्था याबरोबरच इतर कामेसुध्दा त्यांनाच करावी लागते. आरोपीला न्यायालयात ने-आण करणे, उपचारार्थ दवाखान्यात नेणे, कोर्टाचे समन्स पोहोचविणे. सण, उत्सव, जयंती यामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आदी कामे त्यांना यशस्वीरीत्या पार पाडावी लागतात.
आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असल्यातरी त्यांच्या समस्यांची मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना असल्याने संप, आंदोलनाच्या माध्यमातून शासनस्तरावर दबाव आणून त्या सोडविल्या जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. परंतु पोलिसांच्या बाबतीत असे होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागातील पोलिस स्टेशनमध्ये बसण्याकरीता साधी खुर्ची नाही. पिण्याचे पाणी नाही. यासह श्रम परिहाराकीता वेगळी खोली, खेळांचे मैदान, खेळांचे साहित्य, मनोरंजनाची साधने आदींचा अभाव आहे.

पोलिसांना मिळणार हक्काच्या रजा
सुरक्षा व्यवस्था व बंदोबस्ताच्या नावावर पोेलीस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच ठाणेदारांचे अधिकार काढण्यात आलेले आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस आयुक्तांनाही त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. याकरिता थेट अतिरिक्त पोलीस महासंचालकाची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या या आदेशाने कर्मचाऱ्यांना मनमोकळे सुट्या उपभोगता येईल. कर्तव्य बजावताना पोलिसांना मानसिक, शारीरिक थकवा येतो. त्यामुळे ते तणावात असतात. रजाकाळातही कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांत नैराश्य येते असे असतानाही वरिष्ठ साप्ताहिक रजा नाकारत होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होता.

Web Title: Stress increased police suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.