खोटं सोडा अन् गोड-गोड बोला; शिवसेनेच्या ३ नेत्यांना नवनीत राणांकडून 'तिळगुळ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 13:28 IST2023-01-14T13:27:09+5:302023-01-14T13:28:23+5:30
नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं

खोटं सोडा अन् गोड-गोड बोला; शिवसेनेच्या ३ नेत्यांना नवनीत राणांकडून 'तिळगुळ'
अमरावती - धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी कालच व्यक्त केला आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण मिळेल असा माझा विश्वास आहे. जे बाळासाहेबांचे विचार घरात ठेवू शकले नाहीत ते सत्तासाठी काय संघर्ष करणार? असे म्हणत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. आता, पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, शिवसेनेतील ३ नेत्यांना आपण तिळगुळ पाठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. मुंबईतील मातोश्रीबाहेर जाऊन आपण हनुमान चालिसा म्हणण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. तेव्हापासून शिवसेना आणि राणा यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राणा शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता, मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राणा यांनी शिवसेनेतील सुषमा अंधारेंनाही लक्ष्य केलं. महाराष्ट्रातील जनतेला मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. त्यासह, अशी काही नावं आहेत, ज्यांना मी विशेष तिळगुळही पाठवते. कारण जेव्हाही ते बोलतात तेव्हा खोटं बोलतात, कडू बोलतात आणि तिखट बोलतात. उद्दव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या तिघांसाठी मी स्पेशली तिळगुळ पाठवते. आत्ता तरी खोटं बोलणं सोडा, तिखट बोलणं सोडा. माझ्याकडून आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून मी तुम्हाला तिळगुळ देते आणि गोड गोड बोलायची सुरुवात करा, अशा शुभेच्छा तुम्हाला देते, असे खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेत्यांना उद्देशून भाषण केले.
लोकप्रतिनिधीला १३ दिवस तुरुंगात टाकलं
"उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाइव्हवर सरकार अडीच वर्ष चाललं. हनुमान चालीसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला १३ दिवस या उद्धव ठाकरेंनी तुरुंगात टाकलं. बाळासाहेबांचे विचारच त्यांनी घरात ठेवले नाहीत मग यांचं काय होईल?", अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.