संत्रा, केळी, कपाशीवर आघात
By Admin | Updated: October 1, 2014 23:16 IST2014-10-01T23:16:09+5:302014-10-01T23:16:09+5:30
नैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत

संत्रा, केळी, कपाशीवर आघात
अरुण पटोकार - पथ्रोट
नैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील एका संत्राबागाईतदाराने आत्महत्या केल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे.
दीड महिना पावसाने दांडी मारल्याने पेरणीला विलंब झाला. परिणामी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे. कशीबशी उशिराने पेरणी आटोपली. पण, लगेच जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. हा निसर्गाने दिलेला पहिला धक्का. दुबार पेरणी करून शेतकऱ्यांनी कसेबसे सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक उभे केले. त्यावर पुन्हा निसर्गाचा कोप झाला. सोयाबीनवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पीक बुडण्याच्या मार्गावर आहे. मर रोगाने तुरीची झाडे सुकत आहेत. कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांच्या फांद्या वाळत आहेत. हा शेतकऱ्यांना निसर्गाने दिलेला दुसरा धक्का.
मध्यंतरी झालेल्या वादळी पावसामुळे पथ्रोट, पांढरी खानमपूर, अंजनगाव सुर्जी, परिसरातील काही केळीबागा भुईसपाट झाल्या. त्यामध्ये मोजक्याच बागाईतदारांच्या बागा सुदैवाने बचावल्या. पण, निसर्गाने त्यांच्यावर घाला घातलाच. शिल्लक राहिलेल्या केळीच्या बागांवर दव व अज्ञात रोगाने आक्रमण केले. यामुळे बागेतील लहान-लहान व अर्धवट पिकलेली केळी पिवळी व काळी पडली आहेत. झाडांवरील घडही तुटून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा तिसरा धक्का पोहचला आहे.
संत्रा बागाईतदारांची स्थिती त्याहूनही बिकट आहे. वातावरणातील बदल व अज्ञात रोगामुळे मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वच संत्रा बागांमधील हिरवी व पिवळी संत्री गळून पडू लागली आहेत. संत्रा हे रोखीचे पीक आहे. त्यामुळे या पिकाच्या भरवशावर मोठमोठे व्यवहार, कर्जांची देवाणघेवाण आदी केले जातात. मात्र, शासनाकडून नुकसान भरपाई देताना टाळाटाळ केली जाते. शेतकऱ्याला वरून निसर्गाचा व खालून शासनाचा मार सोसावा लागतो. ही शेतकऱ्यांची कुचंबणाच नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.