सातेगावात चोरट्यांनी एटीएम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:29 IST2019-06-26T23:28:41+5:302019-06-26T23:29:34+5:30
तालुक्यातील सातेगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी सळाख घालून उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममधून चोरटे रक्कम काढू शकले नाहीत.

सातेगावात चोरट्यांनी एटीएम फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील सातेगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी सळाख घालून उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममधून चोरटे रक्कम काढू शकले नाहीत.
सातेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरासमोर असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी लोखंडी सळाखीच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मशीनचा समोरील लोखंडी पत्रा उचकटला; परंतु चोरट्यांना एटीएममधील रक्कम काढता आली नाही. ही बँक मुख्य मार्गावर आहे. २६ जूनला पहाटेची रपेट करणाऱ्या नागरिकांना एटीएम फुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सकाळी ७ वाजता रहिमापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. परंतु, १ वाजेपर्यंत रहिमापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते, हे विशेष.
सीसीटीव्ही नाही
सातेगाव येथील एटीएमचा पुढील लोखंडी पत्रा तोडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथे सीसीटीव्ही यंत्रणा नाही व सुरक्षा रक्षकदेखील नाही. पोलिसांच्या हाती यामुळे काहीही लागले नाही.