राज्यातील वाळू मध्य प्रदेशात ‘डम्प’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:06+5:30

धारणी तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील चिचघाट या गावाला लागून तापी नदीचे पात्र आहे. तापी नदीच्या पलीकडे मध्य प्रदेशातील रामाखेडा नावाचे गाव आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्य सरकारांकडून या घाटाचा लिलाव झालेला नाही.

State sand dumped in Madhya Pradesh | राज्यातील वाळू मध्य प्रदेशात ‘डम्प’

राज्यातील वाळू मध्य प्रदेशात ‘डम्प’

ठळक मुद्देअवैध उपसा । चढ्या दरात बनावट रॉयल्टीद्वारे विक्री, महसूल यंत्रणेचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यात आल्यामुळे आता धारणी तालुक्यातील सर्व बांधकामे, खासगी व शासकीय कामावर मध्यप्रदेशातून गौण खनिज आयात करावे लागत आहे. याचा फायदा घेत मध्यप्रदेशातील काही तस्करांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश भूभागाचे सीमांकन करणाऱ्या तापी नदीला तस्करीचे केंद्र बनविण्यात आले आहे. महाराष्ट्र हद्दीत नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून मध्य प्रदेशातील एका गावात साठा करून विक्री करण्याचा सपाटा तस्करांनी चार दिवसांपासून सुरू केला आहे.
धारणी तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील चिचघाट या गावाला लागून तापी नदीचे पात्र आहे. तापी नदीच्या पलीकडे मध्य प्रदेशातील रामाखेडा नावाचे गाव आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्य सरकारांकडून या घाटाचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे लिलाव न झालेल्या घाटातून तस्करांनी रेती खणून नेण्याची नवी युक्ती काढली आहे. मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी महाराष्ट्राच्या हद्दीतील पात्रातून रेतीचा अवैधरीत्या उपसा करून मध्यप्रदेशातील रामखेडा येथे रेतीचे ढीग लावले आहेत. हीच रेती ४७०० रुपये प्रतिब्रास या दराने ट्रॅक्टरधारकांना विकली जाते. याकरिता महाराष्ट्रातील अनेक ट्रॅक्टरचालक-मालक दररोज रामाखेडा ते धारणी असा प्रवास करतात. गरजूंना सात ते साडेसात हजार रुपये दराने बांधकाम करीत असलेल्या गरजूंना अवैध रीतीने मिळविलेल्या रेतीची विक्री केली जात आहे.

धारणीपासून ४० किमी अंतर
सदर रेतीची रॉयल्टी ही मध्यप्रदेशातील मेलचुका घाटातून ऑनलाइन ई-पास द्वारे दिली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष ती रामाखेडा या गावातून खणून आणली जात आहे. रामाखेडा हे गाव खंडवा रोडवरील शेखपुरा गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर साधारणपणे धारणीपासून २५ किलोमीटर येते. ई-पासमध्ये उल्लेखित रेतीघाटाचे मुलचुका हे गाव बऱ्हाणपूर रोडवर असून, त्याचे अंतर साधारणत: ४० किलोमीटर आहे.
महाराष्ट्राला दुहेरी मार : मध्यप्रदेशातील तस्करांनी महाराष्ट्रातील चिचघाट पात्रातून रेती उपसा करून अर्थात चोरी करून मध्य प्रदेशातील रामाखेडा गावाजवळ साठा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रेती चोरीसोबत महसुलाचेसुद्धा नुकसान होत आहे.

रेती अवैधच
मध्य प्रदेशातील शासनाने रेतीघाटाचे लिलाव केले असले तरी लिलाव करण्यात आलेल्या रेतीघाटांमध्ये रामाखेडा येथील घाटाचा उल्लेख नाही. त्यामुळे येथे रेती खणण्याचे उद्योग पूर्णत: अवैध ठरतात. याची चौकशी महाराष्ट्र शासनाकडून होणे गरजेचे आहे.

Web Title: State sand dumped in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू