अस्वच्छता आढळल्यास ‘स्पॉट फाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:58 IST2017-12-31T23:57:46+5:302017-12-31T23:58:10+5:30
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन (जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत.

अस्वच्छता आढळल्यास ‘स्पॉट फाईन’
प्रदीप भाकरे ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन (जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. सुरूअसलेल्या स्वच्छ महाराष्ट्र मिशन व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील सर्व शहरांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू असून अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशांना शौचालय बांधून देऊन राज्याचा संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित केला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार निर्मितीच्या जागीच कचरा विलगीकरण, घनकचरा व्यवस्थापन हाती घेण्यात आले आहे. कचरा विलगीकरणाची जबाबदारी संबंधित कचरा निर्मितीकर्त्त्यांवर टाकली आहे. मात्र, या अभियानाला नागरिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १ मे २०१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरात कचरा लाख मोलाचा या अंतर्गत निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना नागरी स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. नगरविकास विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या अनुषंगाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचचायती स्वच्छतेसाठी झगडत आहेत. स्वच्छतेसाठी नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमिवर जे नागरिक सहकार्य करीत नाहीत, त्यांना दंड आकारले जाईल. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्यातरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार महापालिकांना आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४५० अ मधील तरतुदीनुसार हे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वीही महापालिका अस्वच्छता करणाऱ्याकडून दंड आकारत होती. मात्र, नगरविकास विभागाने ३० डिसेंबरला अधिकृत शासन निर्णय जाहीर करून महापालिकांना तसे अधिकार प्रदान केलेत, यावर शिक्कामोर्तब केले आहे. दंडाचे प्रावधान अ, ब , क, ड असे महापालिका वर्गनिहाय करण्यात आले आहे.
घाणीची व्याख्या
घाण म्हणजे ज्यापासून उपद्रव होऊ शकेल, असे टाकाऊ पदार्थ, धूळ, अस्वच्छ परिस्थिती तसेच नियमान्वये प्रतिबंधित करूनही सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षित जीवन व स्वास्थ्यास बाधा येईल, अशी अस्वच्छता होय. तर घाण करणे म्हणजे सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी निष्काळजीपणे टाकलेली, फेकफेफी, पसरवलेली, अथवा सुटलेली घाण.