चार लाख हेक्टरातील पेरण्या खोळंबल्या
By Admin | Updated: July 6, 2017 00:19 IST2017-07-06T00:19:37+5:302017-07-06T00:19:37+5:30
पेरणीसाठी आवश्यक दमदार पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीपाच्या चार लाख १३ हजार हेक्टर मधील पेरण्या खोळंबल्या आहेत.

चार लाख हेक्टरातील पेरण्या खोळंबल्या
चार तालुके माघारले : जिल्ह्यात खरिपाच्या ५७ टक्के पेरण्या बाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पेरणीसाठी आवश्यक दमदार पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीपाच्या चार लाख १३ हजार हेक्टर मधील पेरण्या खोळंबल्या आहेत. अद्याप ५७ टक्के क्षेत्रात पेरण्या बाकी आहेत. यात अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, भातकुली व दर्यापूर तालुके माघारले आहे. त्यामूळे तूर वगळता कमी कालावधीची कडधान्य बाद होणार आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासुनच पावसाची दडी आहे. रोहीणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले आहेत. यंदाच्या हंगामात अद्यापही मान्सून सक्रिय झालाच नाही. जिल्हयात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ६१ टक्के पाऊस पडला. तोही प्रत्येक तालुक्यात कमी-जास्त असल्यामुळे १० तालुक्यात सरासरी ४० टक्कयाच्या वर पेरण्या झाल्यात. तर चार तालुके माघारले. या तालुक्यामध्ये २० टक्कयाच्या आतच पेरण्या आहेत.
जिल्ह्यात यंदाच्या खरीपासाठी सात लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत तीन लाख १४ हजार ६१३ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. ही ४३.२ टक्केवारी आहे. यामध्ये सोयाबीनसाठी तीन लाख २३ हजार ३८४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना एक लाख ३६ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ४२ टककेवारी आहे. कपाशीसाठी एक लाख ९३ हजार २६१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना एक लाख ६ हजार ४२५ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही ५५ टक्केवारी आहे. तर तुरीसाठी एक लाख १४ हजार १९५ प्रसतावित क्षेत्राच्या तुलनेत ४५ हजार ३११ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ३९.७ टक्केवारी आहे. अन्य पिकांमध्ये धान पाच हजार ३८० हेक्टर, खरीप ज्वारी नऊ हजार ११९ हेक्टर, बाजरी ८५ हेक्टर, मका तीन हजार ५४४ हेक्टर, मूग चार हजार८३२ हेक्टर, उडीद तीन हजार १४५ हेक्टर, भुईमूग ६३६ हेक्टर व तिळाची ३७ हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे. पेरणीचा अवधी निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
तुरळक ठिकाणी पाऊस
जिल्ह्यासह विदर्भ व मध्य महाराष्टात येत्या २४ तासात काही ठिकाणी वादळ, वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.तसेच कोकण विभागात देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्याने पाऊस बेभरवश्याचा राहील,असे शेतकऱ्यांचे मत आहे.
मूग, उडदाचे क्षेत्र होत आहे बाद
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मुगासाठी ४४,३३६ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना सद्यस्थितीत केवळ ४,८३२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यातुलनेत उडिदासाठी ५,६४४ हेक्टर क्षेत्र असताना ३,१४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पावसाने दडी मारल्याने ६० दिवसांचे हे पीक बाद होऊन सोयाबीन व कपाशीच्या क्षेत्रात रूपांतरीत होत आहे.