The sixth finger of the infant was cut with a blade in Melghat | अंधश्रद्धेपायी नवजात बालिकेचे सहावे बोट ब्लेडने छाटले; मेळघाटातील भीषण वास्तव

अंधश्रद्धेपायी नवजात बालिकेचे सहावे बोट ब्लेडने छाटले; मेळघाटातील भीषण वास्तव

ठळक मुद्देचुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारटेंब्रू येथील घटना

मारोती पाटणकर/
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या उजव्या हाताचे सहावे बोट ब्लेडने हड्डीसह छाटल्याचा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्यातील टेंब्रू येथे उघडकीस आला. या अघोरी कार्यामुळे त्या बाळाच्या हातात पस जमा झाल्याने अखेर तिला चुरणी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी भरती करण्यात आले.
आदिवासी समाजात मुलींच्या हातापायाला २१ बोटे असणे अपशकून मानले जाते. अशा मुलींना लग्नावेळी वरपक्षाकडून हीन वागणूक मिळण्याची भीती व्यक्त केली जाते. २१ बोटांची मुलगी घराण्याला बाधक ठरत असल्याची अंधश्रद्धा येथील आदिवासींमध्ये रुळली आहे. त्या अंधश्रद्धेतून त्या नवजात अर्भकाचे सहावे बोट छाटून टाकले.
टेंब्रु गावात १० सप्टेंबर रोजी विमल मोंग्या तांडीलकर (२५) या मातेने जुळ्यांना जन्म दिला. प्रसूतीसाठी गावातील दाई जासमू छोटेलाल कास्देकर हिला बोलावण्यात आले होते. दोन्ही बाळांची प्रसूती सामान्य स्थितीत झाली. त्यांची प्रकृतीदेखील चांगली होती. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील गोणाय सावजी कास्देकर या महिलेने बाळांची पाहणी केली असता स्त्री जातीच्या बाळाच्या उजव्या हाताला सहा बोटे दिसून आली. गोणायने अंधश्रद्धेपोटी बाळाच्या उजव्या हाताचे सहावे बोट ब्लेडने हाडासह छाटून टाकले. बाळाने आकांत केला. त्या जखमेवर जडीबुटी लावून तात्पुरता उपचार करण्यात आला.
मुलगी आकांत करत असतानाही प्रसूता दवाखान्यात जाण्यास उत्सुक नव्हती. चौथ्या दिवशी बाळाच्या हातात पस झाला. त्याची प्रकृती खालावू लागली. दायीच्या सल्ल्यानुसार काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले व उपचार करण्यात आले. पुढे १०८ अ‍ॅम्ब्यूलन्सने तिला चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

आदिवासी समाजात ११ बोटांच्या बाळांबाबत अंधश्रद्धा असल्याचे दायीचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी गावातीलच एका अशिक्षित बाईने ते सहावे बोट कापल्याची माहिती मिळाली.
आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ

Web Title: The sixth finger of the infant was cut with a blade in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.