Amravati | परतवाडा-बैतूल मार्गावर कारची दुचाकीला जबर धडक; सहा ठार, एक गंभीर
By प्रदीप भाकरे | Updated: July 18, 2022 11:03 IST2022-07-18T10:54:12+5:302022-07-18T11:03:22+5:30
पोलिसांनी रस्त्यात पडलेल्या सीट कव्हरवरून शोध घेतला असता ही घटना उघड झाली.

Amravati | परतवाडा-बैतूल मार्गावर कारची दुचाकीला जबर धडक; सहा ठार, एक गंभीर
अमरावती : परतवाडा ते बैतुल मार्गावर निंभोरा फाटा येथे दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकी नाल्यात कोसळली. रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन्ही वाहनातील एकूण सहा जण ठार झाले. पोलिसांनी रस्त्यात पडलेल्या सीट कव्हरवरून शोध घेतला असता ही घटना उघड झाली.
पोलीस सूत्रानुसार, शिरसगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभोरा फाटा येथे 17 जुलै रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलिसांची चमू गस्तीदरम्यान पोहोचली. त्यांना सीट कव्हर रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसले. यामुळे शंका येऊन पोलिसांनी पाहणी केली असता दुचाकी व कार नाल्यात निदर्शनास आली.
बहिरम मार्गावरील एका हार्डवेअर प्रतिष्ठान येथून चालकासह पाच जण एका चारचाकीने रात्री दुकान बंद करून निघाले होते. पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायचे होते. निंभोरा फाट्याजवळ पोहोचतात त्यांच्या चारचाकीने प्रतीक दिनेश मांडवकर (26) यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे चार चाकी अनियंत्रित होऊन नजीकच्या पुलावरून नाल्यात कोसळली. यात संजय गजानन गायन (22, रा बोदड) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी उपचारार्थ दाखल केले आहे. तर अपघातात पांडुरंग रघुनाथ शनवारे (30, रा बोदड ता चांदूर बाजार),सतीश सुखदेव शनवारे (30, रा बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (25, रा. खरपी). चारचाकीचा चालक रमेश धुर्वे (30 रा सालेपूर), दुचाकीचालक प्रतीक दिनेश मांडवकर (26),अक्षय सुभाष देशकर (26, रा बोदड ता चांदूर बाजार) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
चारचाकीमालक आणि हार्डवेअरचा संचालक राजू चुन्नीलाल मानधने (52, रा. परतवाडा) यांनी या घटनेची फिर्याद शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत गीते यांच्या मार्गदर्शनात होत आहे.