‘शॉर्ट सर्किट’मुळेच भुलोरी गाव झाले बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 01:01 IST2019-05-23T01:00:46+5:302019-05-23T01:01:51+5:30
भुलोरी गावात मंगळवारी ४३ घरे व १२ गोठे जाळणारी आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचे महसूल विभागाने पंचनाम्यात नमूद केले आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे आगीत नष्ट झाली. त्यांना महसूल विभाग व प्रकल्प कार्यालयाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.

‘शॉर्ट सर्किट’मुळेच भुलोरी गाव झाले बेचिराख
धारणी : भुलोरी गावात मंगळवारी ४३ घरे व १२ गोठे जाळणारी आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचे महसूल विभागाने पंचनाम्यात नमूद केले आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे आगीत नष्ट झाली. त्यांना महसूल विभाग व प्रकल्प कार्यालयाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.
भुलोरी गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आदिवासी बांधवांच्या घर, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाचे महसूल विभागाने बुधवारी पहाटे ६ पासून सर्वेक्षण करून पंचनामा तयार केला. त्यानुसार ४३ घरे, १२ गोठे जळाल्याने सहा बैल, चार बकºया व ४८ कोंबड्या खाक झाल्या. आगीत सर्वच नष्ट झाल्याने पुन्हा संसार थाटायचा तरी कसा, असा प्रश्न आदिवासी बांधवासमोर उभा ठाकला आहे. काही आदिवासी बांधवांचे सन २०१३ मध्ये लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान झाले होते. एकच संकट दोनदा आल्याने आदिवासी खचले आहेत.
महसूलकडून मदत
महसूल प्रशासनाने आगग्रस्त ४३ आदिवासी कुुटुंबप्रमुखांना कपडे व भांड्याच्या नुकसानाकरिता प्रत्येकी पाच हजार रुपये व आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडून न्यूक्लिअस बजेट अंतर्गत नैसर्गिक आपत्ती अनुदान प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाकडून अनुदान लवकरच देण्यात येणार आहे.
अग्निशमन वाहनाची कमतरता जाणवली
धारणी तालुक्याला अग्निशमन विभाग नाही. अचलपूर, चिखलदरा, मध्य प्रदेशातील शहापूर व बºहाणपूर येथून चार अग्निशमन वाहने ५० ते ९० किमी अंतरावरून आल्यामुळे त्या अवधीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. धारणीत अग्निशामक वाहन असते, तर हे नुकसान टाळता आले असते. त्यामुळे प्रशासन धारणी पालिकेत अग्निशमन वाहन देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
झोप नाही; रात्रभर डोळ्यांतून अश्रुधारा
मंगळवारी रात्री जिल्हा परिषद शाळेत महसूल प्रशासनाकडून आगग्रस्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथेच परिसरातील धान्य गोळा करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, बेघर होऊन सर्वस्व हिरावलेल्या आदिवासी बांधवांच्या पोटात अन्नाचा घास गेलाच नाही. संपूर्ण रात्र त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा होत्या. तहसीलदार सचिन खाडे, नायब तहसीलदार अजिनाथ गांजरे, अनिल नाडेकर, नीलेश सपकाळ, सत्यजित थोरात यांच्यासह सर्वच तलाठी यावेळी तैनात होते.