मोर्शीच्या आजीबाईंची ‘या’ कारणासाठी शिल्पा शेट्टीने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 13:14 IST2020-06-30T13:05:57+5:302020-06-30T13:14:44+5:30
लक्ष्मी ताथोडकर यांचा नृत्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हायरल झाला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘आजीबाई, तुझी फॅन झाले’, अशा ओळी लिहिल्या.

मोर्शीच्या आजीबाईंची ‘या’ कारणासाठी शिल्पा शेट्टीने घेतली दखल
अजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मोर्शी येथील ७५ वर्षीय आजी २५ दिवसांत समाज माध्यमावर ‘स्टार’ झाली आहे. झपाट्याने व्हायरल होत असलेल्या तिच्या व्हिडीओला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या खासगी अकाऊंटवर जागा दिली. खासगी वाहिनीवरील ‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमात त्याचे सादरीकरण होणार आहे.
मालवीयपुरा येथील ७५ वर्षीय लक्ष्मी भास्करराव ताथोडकर यांना बालपणापासून नृत्य व गायनाची आवड होती. पण, त्यांना व्यासपीठ लाभले नाही. लॉकडाऊनपूर्वी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने नाशिक येथील नातजावई संकेत सुखदेव पाटील हे मोर्शी येथे भेटीकरिता आले. याच सुमारास लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे संकेत पाटील यांना नाशिक येथे परत जाता आले नाही. ते मोर्शीतच मुक्कामी होते. यादरम्यान त्या ठणठणीत झाल्या. आपल्या आजेसासूला नृत्याची आवड असल्याचे कळताच संकेत यांनी हिंदी चित्रपट गीतांवरील लक्ष्मी ताथोडकर यांचा नृत्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला.
तो व्हायरल झाला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘आजीबाई, तुझी फॅन झाले’, अशा ओळी लिहिल्या. निवेदक नीलेश साबळे यांनीही लक्ष्मी ताथोडकर यांची दखल घेतली. सिनेतारका सोनाली कुलकर्णी आजीबार्इंच्या अदाकारीला सलाम असल्याची प्रतिक्रिया दिली.