राज्याच्या वनक्षेत्रात मेंढीचराईचा प्रश्न ऐरणीवर; मेंढपाळ आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष
By गणेश वासनिक | Updated: July 14, 2025 14:52 IST2025-07-14T14:51:45+5:302025-07-14T14:52:53+5:30
Amravati : मेंढपाळांबाबत स्वतंत्र धोरणाविषयी शासन स्तरावर अनास्था

Sheep grazing issue in state's forest areas on the agenda; clash between shepherds and forest officials
अमरावती : राज्याच्या काही जिल्ह्यांत मेंढीचराईचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. वनक्षेत्रात चराईमुळे स्थानिक मेंढपाळ आणि वनाधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झालेली आहे. दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढीचराईचा प्रश्न तीव्र होतो. तथापि, राज्य शासनाकडून स्वतंत्र धोरण लागू करण्यात आले नाही. यासंदर्भात ३ जुलै रोजी मंत्रालयात बैठक झाली, पण ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे मेंढपाळ व वनाधिकाऱ्यांमध्ये विसंगती कायम आहे.
बुलढाणा, अकोला, अमरावती, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार व पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत मेंढीचराईचा प्रश्न गंभीर होतो. मेंढपाळांना शेती क्षेत्र किंवा खासगी जमिनीवर चराई करण्यास शेतकऱ्यांकडून मज्जाव केला जातो, अशावेळी मेंढपाळ वनक्षेत्रामध्ये मेंढी चारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मेंढपाळ आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष उद्भवतो. मात्र राज्य शासनाचे मेंढपाळांबाबतच्या स्वतंत्र धोरण नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. तसेच, शास्त्रीयदृष्ट्या या कालावधीत वनक्षेत्रात मेंढीचराई अयोग्य असल्याचे मत विविध अहवालांतून समोर आले आहे. मेंढपाळाच्या प्रश्नांवर गत काही वर्षांपासून मंत्रालयात सभा, बैठकी आवर्जून होतात, परंतु स्वतंत्र धोरणाविषयी शासनादेश जारी केला जात नाही. यंदाही तोच प्रयोग होत असल्याचा अनुभव मेंढपाळांना येत आहे.
मेंढपाळाच्या चराईसंदर्भात मंत्रालयात स्वतंत्र दोन बैठकी
१) वनमंत्री गणेश नाईक यांच्या दालनात ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मेंढपाळांच्या चराई व इतर समस्यांवर उपाययोजना सुचवण्याकरिता बैठक पार पडली. यात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील मेंढपाळांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीचे पत्र शासनस्तरावरून निर्गमित झाले होते.
२) राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत ३ जुलै रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या मागणीनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात मेंढपाळाचे प्रश्न, चराईबाबत मंथन झाले.
वनमंत्री गणेश नाईक यांची मौखिक परवानगी
३ जुलै रोजी झालेल्या दोन्ही स्वंतत्र बैठकीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी मेंढपाळांचे प्रतिनिधी व इतर मंत्र्यांच्या रास्त मागणीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वनक्षेत्रामध्ये मेंढीचराईला परवानगी देण्यात येत आहे, अशा प्रकारचा निर्णय मेंढपाळांसमक्ष त्यांनी दिला. मात्र, वनमंत्र्यांचे हे मौखिक आदेश कागदावरच उतरलेच नाही. वनक्षेत्रामध्ये गुरे चराईचे धोरण राज्यात १९६८ पासून लागू आहे, हे विशेष.
"मेंढपाळांचे प्रश्न, समस्यांविषयी कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. त्याकरिता अर्धबंदिस्त मेंढीपालन हा पायलट प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात आहे. तो राज्यभर राबविला जाईल, त्यामुळे मेंढपाळाची भटकंती थांबून मुलांबाळांना शिक्षण, रोजगाराचे साधन उपलब्ध होईल."
- संतोष महात्मे, धनगर समाजाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)