अमरावती : ब्राह्मणवाडा ते शिरजगाव रोडवरील बगाडीच्या नाल्यात कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासह मारेकऱ्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या काही तासात यश आले. अनिल झनकराम जांभेकर (वय ३५ वर्ष रा. गळंकी औरंगपूर, ता. अचलपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्या महिलेसोबत आपले प्रेमसंबंध होते, मात्र ती वारंवार पैसे मागायची, त्याला कंटाळून तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. दुर्गा विशाल श्रोती (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे.शिरजगाव कसबा पोलिसांच्या हद्दीतील बगाडीच्या नाल्यात एका महिलेचे कुजलेले प्रेत असल्याचे १० जुलै रोजी दुपारी उघड झाले होते. ती माहिती मिळताच एएसपी पंकज कुमावत, सहायक पोलिस अधीक्षक शुभम कुमार, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्यासह ठाणेदार महेंद्र गवई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तो मृतदेह ब्लँकेटमध्ये हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला होता. गळा आवळल्याच्या खुणाही आढळल्याने उशिरा रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबतच, मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस कामाला लागलेत.
‘ती’वारंवार पैसे मागायची; म्हणून आवळला गळा! प्रेमसंबंधातून महिलेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:32 IST